आपल्या अधिकारक्षेत्रात रहा; ममतांनी राज्यपालांना खडसावलं

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

हे पत्र नऊ पानांचे असून त्यांनी राज्यापालांना आपल्या अधिकारक्षेत्रात राहण्यासाठी एकप्रकारे खडसावले आहे. 

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री ममता बॅनर्जी यांनी काल शनिवारी राज्यपाल जगदीप धनखड यांना पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यपाल यांना संविधानाच्या कक्षेत राहण्याचा सल्ला दिला आहे. जगदीप धनखड यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलिस प्रमुखांना लिहलेल्या पत्राला धरुन ममता बॅनर्जी यांनी हे पत्र लिहलं आहे. हे पत्र नऊ पानांचे असून त्यांनी राज्यापालांना आपल्या अधिकारक्षेत्रात राहण्यासाठी एकप्रकारे खडसावले आहे. 

हेही वाचा - वाजपेयींच्या स्वप्नातली NDA राहिली नाही; अकाली दलाने 22 वर्षांची सोडली साथ

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, आपण पोलिस महासंचालकांना लिहलेल्या पत्रामुळे मी नाराज आणि दुखी आहे. सोबतच याविषयासंदर्भातील आपलं ट्विटरवरील ट्विट पाहूनही दुख झालं. पुढे बॅनर्जी यांनी म्हटलंय की, अनुच्छेद 163 नुसार आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्याच्या आणि मंत्रीमंडळाच्या सहकार्याने आणि सल्ल्याने काम करणे अपेक्षित आहे. हेच आपल्या लोकशाहीचेही सार आहे. आपल्याकडे असणारे अधिकारक्षेत्र ओलांडून मुख्यमंत्रीपदाला डावलणे आणि राज्यातील अधिकाऱ्यांना आदेश देणे यासारख्या गोष्टींपासून लांब रहा, असा सल्लाही ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना दिला. 

या सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीलाच राज्यपाल यांनी पोलिस महासंचालक वीरेंद्र यांना पत्र लिहलं होतं. या पत्रामध्ये त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर महासंचालक वीरेद्र यांच्याकडून दोन ओळींचे उत्तर आलं होतं. तेंव्हा राज्यापालांनी त्यांना 26 सप्टेंबरपर्यंत भेटण्यासाठी बोलावलं होतं. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काही ठोस पावले उचलण्यासाठीचे प्रयत्न करायला सांगितले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamata Banerjee warns Governor Dhankhar of legal consequences