लोकशाहीद्रोही भाजपशी लढण्याची हिच वेळ; ममतांचं पत्रांद्वारे विरोधकांना एकजुटीचं आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banerjee

जवळपास सात पानांच्या या खरमरीत पत्रात ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या एकूण कार्यपद्धतीवर आसूड ओढले आहेत.

लोकशाहीद्रोही भाजपशी लढण्याची हिच वेळ; ममतांचं पत्रांद्वारे विरोधकांना एकजुटीचं आव्हान

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना पत्र लिहलं आहे. लोकशाहीविरोधी भाजपच्या विरोधात लढा पुकारण्याची हीच वेळ असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी या पत्रात म्हटलं आहे. या पत्रामध्ये ममता बॅनर्जी यांनी लिहलंय की, लोकशाहीवर भाजपाने चालवलेल्या हल्ल्याच्या विरोधात संघर्ष उभा करण्याची वेळ आता आली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकींचे वारे जोरात वाहू लागलेले असतानाच त्यांचे हे पत्र समोर आले आहे. 

ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, शरद पवार, एमके स्टालिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, जगन रेड्डी, के. एस. रेड्डी, फारुक अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांना वैयक्तिकरित्या पत्र लिहून समर्थन मागितलं आहे. जवळपास सात पानांच्या या खरमरीत पत्रात ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या एकूण कार्यपद्धतीवर आसूड ओढले आहेत. या पत्रात त्यांनी लिहलंय की, भाजपने लोकशाही आणि संविधानावर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात एकत्रित येऊन प्रभावीपणे संघर्ष केला गेला पाहिजे. 

हेही वाचा - 'कोरोना आव्हानातही भारतीय अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन'; वर्ल्ड बँकेकडून तोंडभरून कौतुक

नॅशनल कॅपिटल टेरीटोरी ऑफ इंडिया ऍक्टला विरोध
पुढे त्यांनी या पत्रात लिहलंय की, गैरभाजप पक्षांचं राज्य असणाऱ्या राज्यांमध्ये केंद्र आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा दुरुपयोग केला जात आहे. त्या माध्यमातून सरकारांना अडचणीत आणलं जात आहे. ममता यांनी हे देखील स्पष्ट केलं आहे की, NCT विधेयकाचं पारित होणं हा एक गंभीर विषय आहे आणि भाजप सरकारने लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेल्या सरकारच्या सर्व शक्तींना काढून घेतलं आहे. NCT ऍक्टचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की उपराज्यपालांना दिल्लीचा अघोषित असा व्हाईसरॉय बनवलं गेलं आहे, जे गृहमंत्री आणि पंतप्रधानांचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. तसेच हा कायदा म्हणजे भारताच्या संघरचनेला उद्ध्वस्त करणारा कायदा असं म्हटलं आहे.  त्यांनी लिहलंय की, भाजपचे सरकार CBI, ED आणि इतर अनेक केंद्रीय एजेन्सीजचा उपयोग विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात करत आहे. मोदी सरकारच्या आदेशान्वये ED ने तृणमूल काँग्रेस, DMK सहित इतर पार्टीच्या नेत्यांवर छापेमारी केली आहे. 

Web Title: Mamata Banerjee Writes Leaders Against Bjps Attacks Democracy Constitution

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..