esakal | 'कोरोना आव्हानातही भारतीय अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन'; वर्ल्ड बँकेकडून तोंडभरून कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

Economy

भारतात कोरोनाचं संकट उद्भवण्यापूर्वीच अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. अर्थव्यवस्थेचं कंबरडं कोरोना संकटाने अधिकच मोडलं.

'कोरोना आव्हानातही भारतीय अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन'; वर्ल्ड बँकेकडून तोंडभरून कौतुक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. आणि हे आव्हान आजही कायम आहे. आजही कोरोनाची परिस्थिती कमी झालेली नसल्यामुळे अनेक देश त्यामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक संकटाला तोंड देताना पहायला मिळत आहेत. भारतात कोरोनाचं संकट उद्भवण्यापूर्वीच अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. अर्थव्यवस्थेचं कंबरडं कोरोना संकटाने अधिकच मोडलं. मात्र, असं असलं तरीही सध्या भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी घेताना दिसत आहे. आणि आता हे निरिक्षण मांडलं आहे, ते वर्ल्ड बँकेने. वर्ल्ड बँकेच्यानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेने गेल्या एका वर्षात कोरोना महामारी आणि देशव्यापी लॉकडाऊननंतर देखील उल्लेखनिय अशी कामगिरी करत उभारी घेतलेली पहायला मिळत आहे.

वर्ल्ड बँकेने आज आपल्या नव्या रिपोर्टमध्ये भविष्यवाणी केली आहे की, आर्थिक वर्ष (FY21-22) मध्ये देशाच्या वास्तविक जीडीपीतील वाढ 7.5 ते 12.5 टक्क्यांपर्यंत राहू शकते.  वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) च्या वार्षिक स्प्रिंग बैठकीच्या आधी जाहीर केलेल्या आपल्या साउथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्टमध्ये म्हटलंय की, कोरोना महामारी येण्याआधीपासूनच अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. यामध्ये म्हटलं गेलंय की, आर्थिक वर्ष 2017 मध्ये विकास दर 8.3 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर आर्थिक वर्ष 2020 मध्ये तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी होऊन 4.0 टक्क्यांवर पोहोचला होता. 

हेही वाचा - सण उत्सवामुळे एप्रिल महिन्यात इतक्या दिवस बँका राहणार बंद

दक्षिण आशिया क्षेत्रासाठी वर्ल्ड बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ज्ञ हंस टिमर यांनी म्हटलं की, ही एक आश्चर्याची बाब आहे की भारत एका वर्ष आधीच्या तुलनेत पुढे आला आहे. जर आपण एक वर्ष आधीच्या परिस्थितीबाबत विचार कराल तर आपल्याला दिसेल की अभूतपूर्व अशी घट होती. लसीसंदर्भात कसल्याही प्रकारची स्पष्टता नव्हती. कोरोना महासाथीबाबत सगळ्या प्रकारची अनिश्चितताच होती. मात्र, जर आपण आता याच परिस्थितीकडे पाहून तुलना कराल तर भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा उभारी घेतलेली दिसून येत आहे. लसीकरणास सुरवात झाली आहे आणि लसनिर्मितीची प्रक्रिया अग्रभागी आहे. पुढे या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, हे खरंय की परिस्थिती अजूनही अनिश्चित आणि आव्हानात्मकच आहे. भारतासारख्या देशात प्रत्येकापर्यंत लस पोहोचवणे हे एक मोठं आव्हान आहे. अनेक जण या आव्हानाला कमी लेखत होते. 

loading image