संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या कंगनाच्या चाहत्याला अटक; मुंबई ATS ची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

शिवसेना नेते संजय राऊत यांना सोशल नेटवर्किंग साइटवरून धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला शुक्रवारी अटक करण्यात आली. 

कोलकाता - शिवसेना नेते संजय राऊत यांना सोशल नेटवर्किंग साइटवरून धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला शुक्रवारी अटक करण्यात आली. संबंधित व्यक्तीने दावा केला आहे की, तो कंगनाचा चाहता आहे. मुंबई पोलिसांच्या एका पथकाने कोलकाता पोलिसांच्या मदतीनं पलाश घोष नावाच्या व्यक्तीला खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक केली आहे. शुक्रवारी टॉलीगंज इथल्या त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. 

पलाश घोषने सोशल नेटवर्किंस साइटवर शिवसेना नेते संजय राऊत यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं होतं. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोलकाता पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर पलाश घोषला ताब्यात घेण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार त्याला कोलकाता इथं न्यायालयात हजर केलं जाईल. मुंबई पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करेल. संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर कंगना राऩौत हिने बॉलीवूडमध्ये ड्रग्जसाठी साटंलोटं असल्याचा आरोप केला होता. कंगनाने म्हटलं की, ती यावर जबाब देऊ इच्छिते पण मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. मुंबई पोलिसांची भीती वाटते. इतकंच नाही तर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानं मोठा वादही निर्माण झाला आहे. 

हे वाचा - "कोरोनाला रोखण्यासाठी किम जोंग उनचा पाहताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश"

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. मुंबईत भीती वाटते तर तिने इथं येऊ नये असंही त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा मुंबईत येणार असून कोणाची हिम्मत असेल तर अडवून दाखवा असंही कंगनाने म्हटलं होतं. त्यानंतर कंगनाला केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षासुद्धा पुरवली आहे. त्याच सुरक्षेसह ती मुंबईत परतली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man arrested for threatening sanjay raut from kolkata action by mumbai ats