esakal | माणुसकी महत्त्वाची; रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने तोडला रोजा

बोलून बातमी शोधा

माणुसकी महत्त्वाची; रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने तोडला रोजा
माणुसकी महत्त्वाची; रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने तोडला रोजा
sakal_logo
By
शर्वरी जोशी

इस्लाम धर्मीयांचा पवित्र महिना म्हणजे रमजान. या महिन्यात मुस्लीम बांधवांकडून रोजा केला जातो. त्यामुळे सुर्योदयानंतर अन्नाचा एक कणही हे बांधव खात नाहीत. केवळ अन्नच कशाला तर, पाणी किंवा थुंकीसुद्धा ते गिळत नाहीत. पण, एका मुस्लीम बांधवाने हा नियम तोडला आहे. विशेष म्हणजे त्याच्या रोजा तोडण्यामागील कारण ऐकल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर, बेड, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा निर्माण होत आहे. यामध्येच सध्या अनेक रुग्ण प्लाझ्माच्यादेखील प्रतीक्षेत आहे. विशेष म्हणजे अकील मंसूरी या व्यक्तीने दोन महिलांना प्लाझ्मा दान करण्यासाठी त्यांचा रोजा तोडला आहे. याविषयी 'इ टीव्ही भारत'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

उदयपूर येथील पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये निर्मला व अलका या दोन महिलांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान, या दोघींची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना ए पॉझिटिव्ह रक्तगटाची व प्लाझ्माची आवश्यकता होती. यावेळी अकील या दोघींच्या मदतीसाठी धावून आले. परंतु, त्यांना त्यांचा रोजा तोडावा लागला.

अकील यांनी या दोन्ही महिलांना प्लाझ्मा देण्यास तयारी दर्शविली. परंतु, रिकाम्यापोटी प्लाझ्मा दान करता येत नाही, असं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं. विशेष म्हणजे अकील यांनी क्षणाचाही विलंब न करता रोजा तोडत या महिलांना प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अकील यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रथम नाश्ता केला. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांनी त्यांचा प्लाझ्मा दान केला. विशेष म्हणजे त्यांच्या या सत्कार्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.