सलाम! जवानाचं प्रसंगावधान, स्टेशनवर बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाचा वाचवला जीव; VIDEO VIRAL

टीम ई सकाळ
Tuesday, 19 January 2021

एका व्यक्तीला अचानक चक्कर आली. तेव्हा त्याचा जीव CISF च्या एका जवानाच्या प्रसंगावधानतेमुळे वाचला.

नवी दिल्ली - दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीला अचानक चक्कर आली. तेव्हा त्याचा जीव CISF च्या एका जवानाच्या प्रसंगावधानतेमुळे वाचला. कॉन्स्टेबल विकास सांयकाळी मेट्रो स्टेशनवर ड्युटी करत होते. त्यावेळी घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसतं की, कॉन्स्टेबलच्या शेजारी उभा असलेली व्यक्ती अचानक थरथर कापायला लागते आणि जमिनीवर पडते. यावेळी त्या व्यक्तीला जखमही जाली आहे. सीआय़एसएफने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल विकास यांनी जेव्हा व्यक्तीला बेशुद्धावस्थेत पडेललं पाहिलं तेव्हा लगेच त्याच्याकडे धाव घेतली. तोंडावर पडलेल्या त्या व्यक्तीला श्वासही नीट घेता येत नव्हता. अशा परिस्थितीत प्रसंगावधान राखत विकास यांनी कृत्रिम पद्धतीने संबंधित व्यक्तीला श्वास दिला. 

विकास यांनी केलेल्या प्रयत्नामुळे बेशुद्ध झालेली व्यक्ती शुद्धीवर आली. या व्यक्तीचे नाव सत्यनारायण असं असून दिल्लीतील जनकपुरी भागात राहते. थोड्या वेळाने दिल्ली मेट्रो रेल्वे पोलिस आणि अॅम्ब्युलन्ससुद्धा बोलावण्यात आली. 

हे वाचा - परीक्षा न देता IAS झाली लोकसभा अध्यक्षांची मुलगी? वाचा काय आहे सत्य

सीआयएसएफचे शिफ्ट इन चार्ज आणि स्टेशन कंट्रोलरसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर सत्यनारायण यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. आणखी उपाचारासाठी त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला.  चेहऱ्यावर पडल्याने त्यांना जखम झाली होती. सध्या ते पूर्ण ठणठणीत असून शुद्धीत आल्यानंतर त्यांनी जवानांचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man collapsed on metro station cisf jawan saved life