esakal | परीक्षेसाठी गर्भवती पत्नीला दुचाकीवरून 1200 किमी केला प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

WIFE HUSBAND

तीन महिन्यांपासून पती बेरोजगार होता आणि पत्नीचे दागिणे गहाण ठेऊन त्यांनी स्कुटरमध्ये पेट्रोल भरले आणि तिला परीक्षा केंद्रावर पोहोचवलं.

परीक्षेसाठी गर्भवती पत्नीला दुचाकीवरून 1200 किमी केला प्रवास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ग्वाल्हेर - इच्छा तेथे मार्ग असे म्हटलं जाते. कितीही अडथळे आले तरी इच्छेच्या जोरावर हवी असणारी गोष्ट साध्य करु शकतो. याची प्रचिती नुकतीच आली असून १२०० किलोमीटर अंतरावरच्या परीक्षा केंद्रावर गर्भवती पत्नीला चक्क स्कुटरवरून नेल्याचा प्रकार घडला आहे. तीन महिन्यांपासून पती बेरोजगार होता आणि पत्नीचे दागिणे गहाण ठेऊन त्यांनी स्कुटरमध्ये पेट्रोल भरले. झारखंडहून मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर असा दुचाकीवरून प्रवास केला. यादरम्यान एक रात्र त्यांनी बागेत काढली.

धनंजयकुमार हांसदा आणि सोनी हेम्ब्रम असे जोडप्याचे नाव आहे. त्याची पत्नी सहा महिन्याची गरोदर होती. तरीही त्यांनी धाडस दाखवले आणि आणि ग्वाल्हेर येथे डिप्लोमाची परीक्षा दिली. धनंजकुमार हा झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील गंटा टोला गावचा रहिवासी. त्याचे उत्पन्न जेमतेम आहे. त्याची पत्नी सोनी हम्ब्रम ही सहा महिन्याची गरोदर आहे.

हे वाचा - 'जाईन तर रेल्वेनेच', एका मुलीच्या हट्टासाठी 'राजधानी' धावली 535 किमी

सोनी यांची डिप्लोमा पार्ट-२ परीक्षेची तारीख जाहीर झाली. ही परीक्षा ग्वाल्हेरला होती. हे परीक्षा केंद्र गावापासून १२०० किलोमीटर अंतरावर. सध्या कोरोनामुळे रेल्वे आणि बस सेवा बंद आहेत. अशा स्थितीत खासगी वाहन करुन परीक्षेला जाणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी १२०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आपल्या गाडीने पार करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी परीक्षेसाठी तीन राज्य झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशातील रस्ते, घाट, नदी नाले पार केले. शेवटी ते मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरला सहीसलामत पोचले.

सध्या सोनी यांची परीक्षा सुरू आहे. धनंजय यांनी २८ ऑगस्ट रोजी प्रवास सुरू केला आणि ३० ऑगस्ट रोजी ग्वाल्हेरला पोचले. प्रवासासाठी पैसे नव्हते. अखेर दागिणे गहाण ठेउन ते निघाले. सोबत रेनकोट ठेवला होता. झारखंडच्या या जोडप्याची दखल मध्यप्रदेश सरकारने घेतली असून त्यांना परतण्यासाठी दिल्लीपर्यंत विमानाचे तिकीट काढले असून तेथून गावाकडे जाण्याची देखील सोय केली जाणार आहे. त्यांचे स्कूटर रेल्वेने पाठवण्यात येणार आहे.