अन् वृद्धाने सरकारला दान केली दीड कोटीची संपत्ती; नेमकं काय आहे प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man Wills Property Worth ₹ 1.5 Crore To UP Government

अन् वृद्धाने सरकारला दान केली दीड कोटीची संपत्ती; नेमकं काय आहे प्रकरण?

संपत्तीवरुन अनेक कुटूंबात वाद झाल्याच्या धक्कादायक घटना समोर येत असतात. कधी कधी संपत्तीमुळे होणारे वाद जीवावर बेतात. दरम्यान, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून अजब घटना समोर आली आहे. एका वृद्धाने आपली संपत्ती थेट सरकारला दान केली आहे. (Man Wills Property Worth ₹ 1.5 Crore To UP Government )

एकेकाळी कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणवली जाणारी घरातील वडीलधाऱ्यांना वृद्धाश्रमांची जागा दाखवण्यात येत असल्याच्या घटना समाजात वारंवार घडत असतात. आपल्याच कुटुंबातील ज्येष्ठांना अपमानास्पद वागणूक देण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये घडला. त्याचं रागातून एका वृद्धाने सरकारला दीड कोटीची संपत्ती दान केली.

Liquor Scam : मनीष सिसोदियांनंतर ED कडून आणखी एकावर कारवाई; आतापर्यंत 11 जणांना अटक

नथू सिंह असे या वृद्धाचे नाव आहे. ८० वर्षीय या वृद्धाने मुलगा आणि सुनेच्या त्रासामुळे आपली संपत्ती राज्यपालांना दान केली. ते व्यवसायाने शेतकरी आहेत. आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या कृत्यामुळे ते खूप दुःखी आहेत. नाथू सिंह यांचं म्हणणं आहे की, मुलगा आणि सून त्यांना चांगली वागणूक देत नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यांची सुमारे 1.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता राज्यपालांना दान केली आहे.

मुझफ्फरनगरच्या बिरल गावात राहणारे नाथू सिंह सध्या वृद्धाश्रमात राहतात. एका मुलाशिवाय त्यांना तीन मुलीही आहेत. त्यांनी सांगितलं की, आपल्या कोणत्याही मुलाला आपल्या मालमत्तेचा वारस मिळावा अशी आपली इच्छा नाही.

'शनिवारी मी यूपीच्या राज्यपालांना संपत्ती सुपूर्द करण्यासाठी शपथपत्र दाखल केलं, माझ्या मृत्यूनंतर सरकारने या जमिनीवर शाळा किंवा रुग्णालय सुरू करावं, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली असल्याची माहिती दिली आहे.

नाथू सिंह नेमकं काय म्हणाले?

'वयाच्या या टप्प्यावर मी माझा मुलगा आणि सुनेसोबत राहायला हवे होते, पण त्यांनी माझ्याशी चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळेच मी राज्यपालांकडे मालमत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्याचा योग्य वापर करता येईल.

वृद्धाश्रमाच्या प्रभारी रेखा सिंह यांनी सांगितलं की, "नाथू सिंह ठाम होते आणि त्यांनी शनिवारी आपली मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी शपथपत्र दाखल केलं." नाथू सिंह यांची अशी इच्छा आहे, की त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही त्यांच्या कुटुंबातील लोकांनी येऊ नये.

दरम्यान, बुढाणा तहसीलचे उपनिबंधक पंकज जैन म्हणाले, "वृद्ध व्यक्तीची विनंती नोंदवण्यात आली आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात सुमारे दीड कोटी रुपयांच्या संपत्तीचा खुलासा केला असून त्यात निवासी घर, शेतजमीन आणि स्थावर मालमत्ता यांचा समावेश आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याची अंमलबजावणी होईल.