हैदराबाद एन्काऊंटर हा भयानक प्रकार: मनेका गांधी

वृत्तसंस्था
Friday, 6 December 2019

हैदराबाद एन्काऊंटर हा अत्यंत भयानक प्रकार असून, तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या खासदार मनेका गांधी यांनी आज (शुक्रवार) दिली.

नवी दिल्ली: हैदराबाद एन्काऊंटर हा अत्यंत भयानक प्रकार असून, तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या खासदार मनेका गांधी यांनी आज (शुक्रवार) दिली. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस चकमकीत ठार झाले आहेत.

हैदराबाद बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्याबरोबरच घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी आरोपींना नेण्यात आले होते. पोलिसांच्या तावडीतून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा एन्काऊंटर केला. पहाटे तीन वाजता ही घटना घडली. या घटनेचे देशभरात दोन्ही बाजूंनी पडसाद उमटत आहेत.

मनेका गांधी म्हणाल्या, 'हैदराबाद एन्काऊंटर हा देशासाठी अत्यंत भयानक आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. न्यायालयाने त्यांना अशीही फाशीची शिक्षा सुनावली असती. तर तुम्ही न्यायलयीन प्रक्रिया सुरु होण्याआधीच गोळी चालवणार असाल, तर मग न्यायालय, कायदा आणि पोलिस असण्याचा अर्थ काय?.'

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, 'एन्काऊंटर करण्याची पद्धत चुकीची आहे. या घटनेनंतर द्विधा मनस्थिती आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे, परंतु, कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maneka gandhi questions hyderabad encounter