अरविंद उंटावाले यांचे निधन

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

ज्येष्ठ संशोधक आणि निसर्गप्रेमी अरविंद गजानन उंटावाले यांचे आज पहाटे मणिपाल इस्पितळात अल्प आजाराने निधन झाले.

पणजी : ज्येष्ठ संशोधक आणि निसर्गप्रेमी अरविंद गजानन उंटावाले यांचे आज पहाटे मणिपाल इस्पितळात अल्प आजाराने निधन झाले.

निवृ्त्तीनंतर दोन दशके ते निसर्ग व पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सक्रीय होते. गोवा खारफुटी संघटनेचे मानद सचिव म्हणून ते काम पाहत होते. दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे ते माजी उपसंचालक होते.

उंटावाले यांचा जन्म २६ जून १९४० रोजी झाला. नागपूर विद्यापीठातून त्यांनी १९६४ मध्ये वनस्पतीशास्त्रात पदवी, १९६६ मध्ये पदव्युत्तर पदवी आणि १९७२ मध्ये पीएचडी पदवी मिळवली. १९७३ मध्ये ते एनआयओमध्ये संशोधक म्हणून रुजू झाले. शिवाजी विद्यापीठ, गोवा विद्यापीठ आणि अमरुठी विद्यापीठीच्या शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. जगभरातील २२ देशांत प्रवास केलेल्या उंटावाले यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, उंटावाले यांनी विज्ञान विशेषतः समुद्र विज्ञान आणि खारफुटी संवर्धन या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले होते. देशातील नामांकित अशा संशोधनपर संस्थांत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. एनआयओचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. किनारी जैवविविधता आणि वाळूच्या टेकड्या संवर्धनासाठी ते प्रयत्नरत होते. त्यांनी एक जागतिक व तीन राष्ट्रीय पेटंट मिळवली आहेत. १२५ संशोधनपर निबंधांचे लेखन त्यांनी केले आहे. चोडण बेटावर डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य होण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी त्यांना तुम्ही गोव्यासाठी का करत नाही अशी विचारणा केली होती. तेव्हा जैव विविधतेने नटलेली चोडण बेटावरील २५० एकर जमीन त्यांनी शोधली. सरकारने ती संपादीत केली. ५० एकर जमीन मत्स्य पैदाशीसाठी सोडली व उर्वरीत जागेत अभयारण निर्माण केले आहे. त्यांच्याच संकल्पनेतून पणजीलगत खारफुटीतून विहाराची सोय सरकारने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangroves’ best friend Arvind untawale passes away