
Manish Sisodia : शिक्षकांचे प्रशिक्षण रोखण्याचे राजकारण; मनीष सिसोदिया
नवी दिल्ली : शिक्षकांना प्रशिक्षणासाठी फिनलंडला पाठविण्याचे आप सरकारचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजप सरकार घाणेरडे राजकारण करत आहे, असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषदेत केला. आतापर्यंत १,१०० शिक्षकांनी फिनलॅंडसह सिंगापूर, ब्रिटन आदी देशांमध्ये प्रशिक्षण घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, की भाजपच्या लोकांनी सेवा विभागावर अनधिकृत ताबा मिळविला असून शिक्षकांना सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यापासून आप सरकारला रोखण्यासाठी भाजप घाणेरडे राजकारण करत आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांना मुलांच्या भविष्याची काळजी वाटते. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, अशीही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे, त्यांनी शिक्षकांचे प्रशिक्षण रोखण्याच्या भाजपच्या कटात सहभागी होऊ नये, असे आवाहनही सिसोदिया यांनी केले.
ते म्हणाले, की आम्हाला ३० शिक्षकांच्या तुकडीला फिनलॅंडला प्रशिक्षणासाठी पाठवायचे आहे. मात्र, नायब राज्यपालांनी कोणतेतरी कारण देत उशीर केला. दिल्ली सरकारला शिक्षकांना फिनलॅंडला प्रशिक्षणासाठी पाठविण्यापासून रोखण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.
फिनलंड हा शैक्षणिक सुधारणा करणारा सर्वोत्तम देश असल्याने आम्ही शिक्षकांना फिनलॅंडला पाठवीत आहोत. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षक योगदान देतात. त्यामुळे, आम्ही आमच्या शिक्षकांना अशा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाला पाठवू इच्छितो.
भाजपला हे काहीही माहीत नाही, कारण त्यांना शिक्षणाशी काहीही देणेघेणे नाही. दरम्यान, सिसोदियांच्या या आरोपांवर भाजप किंवा नायब राज्यपालांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनाही रोखणार का?
आम्ही नायब राज्यपालांना शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भातील फाइल पाठविली होती. मात्र, त्यांनी असे प्रशिक्षण भारतातच दिल्यास होण्याऱ्या खर्चाविषयी विचारणा केली. पंतप्रधान तसेच भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री जागतिक आर्थिक परिषदेला जात आहेत. त्यांनाही खर्चावरून अशा प्रकारे थांबविणार का, असा सवालही सिसोदियांनी केला.