फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव

भाजप भगाओ, देश बचाओ- लालू प्रसाद यादव
भाजप भगाओ, देश बचाओ- लालू प्रसाद यादव

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे कोणतेही राजकीय सिद्धांत अथवा नैतिक मूल्ये नाहीत. आम्ही वचन पाळणारे आहोत त्यामुळेच निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर आम्ही नितीश यांनाच मुख्यमंत्री केले; पण त्यांनी धोका दिला. हा त्यांचा शेवटचा धोका असून, येथून पुढे त्यांच्यावर कोणीही विश्‍वास ठेवणार नाही. फाशी दिली तरीसुद्धा आम्ही भाजपशी समझोता करणार नाही, अशी गर्जना राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी आज येथे 'भाजप भगाओ, देश बचाओ' रॅलीमध्ये केली. 'राजद'च्या या महारॅलीस पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, 'जेडीयू'चे बंडखोर नेते शरद यादव, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना लालू म्हणाले की, ''बिहारमध्ये पूर आलेला नाही तर तो गैरव्यवहार करून आणण्यात आला आहे. जातीयवादी, फॅसिस्ट शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाआघाडी स्थापन केली होती. नितीशकुमार हा चांगला माणूस नाही, हे आम्हाला आधीच माहीत होते; पण देश फुटीच्या मार्गावर असल्याने आम्ही या आघाडीस हिरवा कंदील दर्शविला. नितीश यांना मीच तयार केले. ते आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वळचणीला गेले असले तरीसुद्धा ते प्रोडक्‍ट आमचे आहे. शरद यादव यांनीच त्यांना केंद्रामध्ये मंत्री केले होते. आता तोच माणूस सांगतो मी लालूंना तयार केले. आणीबाणीच्या काळामध्ये आम्हाला 'मिसा' कायद्याखाली अटक करण्यात आली होती, तेव्हा नितीश यांचा कोठेच थांगपत्ता नव्हता.''

बडे भांडवलदार आणि गरीब जनता अशा दोन भागांत देश विभागला गेला असून, केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. आमचे सरकार गरिबांच्या हिताची लढाई लढत राहील.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री. प. बंगाल.

लालूप्रसाद हे माझे काका आहेत. केंद्राने मागील तीन वर्षांत काय कामे केली याचा लेखाजोखा सादर करावा, 'अच्छे दिन' कोठे आहेत हे जनतेला सांगावे. मोदींनी मदत जाहीर केली तरीसुद्धा याचा लाभ गरिबांना का मिळत नाही?
- अखिलेश यादव, माजी उपमुख्यमंत्री

महाआघाडी तोडून नितीश यांनी आमच्या पाठीत सुरा खुपसला आहे. हा 'हर हर मोदी नसून, बर्बर मोदी, गडबड मोदी' आहे. नितीश यांनी महात्मा गांधीजींच्या मारेकऱ्यांसमोर गुडघे टेकले.
- तेजस्वी यादव, माजी उपमुख्यमंत्री

आता राष्ट्रीय पातळीवर नवी महाआघाडी स्थापन केली जाईल, यासाठी मी देशातील सव्वाशे कोटी जनतेला प्रत्यक्ष भेटणार आहे. धर्म आणि राजकारणाचे मिश्रण देशासाठी धोकादायक आहे.
- शरद यादव, 'जेडीयू'चे बंडखोर नेते.

महारॅलीमध्ये यांचा सहभाग
लालूप्रसाद यादव यांच्या आजच्या सभेमध्ये राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास मोर्चा, राष्ट्रीय लोकदल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत 16 प्रादेशिक पक्ष सहभागी झाले होते. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि 'बसप'च्या सर्वेसर्वा मायावती यात सहभागी होऊ शकल्या नाहीत; पण त्यांनी आपले शुभेच्छा संदेश पाठविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com