अटलजी, अडवानीजींसारखा भाजप राहिला नाही : यशवंत सिन्हा

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

वरिष्ठ आणि महत्वाच्या नेतेमंडळींना पक्षाध्यक्षांची भेट घेता येत नाही. त्यामुळे मी आश्चर्यचकित झालेलो नाही. मी त्यांची भेट घेण्यासाठी 13 महिन्यांपासून वाट पाहत होतो. मात्र, आता त्यांची भेट मी घेणार नाही. मी आता थेट जनतेतून संवाद साधणार आहे.   

जबलपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर मोदींची भेट न मिळाल्याने त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले, मोदींची भेट आता मिळू शकत नाही. त्यामुळे मी त्यांची भेट आता घेणार नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांच्यासारखा भाजप आता राहिला नाही.

जीएसटी, नोटाबंदी यांसारख्या केंद्र सरकारच्या विविध निर्णयाला सिन्हांनी जाहीरपणे विरोध केला. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, आज भाजप अटलजी आणि अडवानीजी यांच्यावेळेस जसा होता, तसा राहिलेला नाही. अटलजी आणि अडवानीजी यांच्या काळात कार्यकर्ते दिल्लीला जाऊ शकत होते. ते तत्कालीन पक्षाध्यक्ष अडवानींची कोणत्याही पूर्वनियोजित वेळेशिवाय भेट घेता येत होती. मात्र, आताची परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता वरिष्ठ आणि महत्वाच्या नेतेमंडळींना पक्षाध्यक्षांची भेट घेता येत नाही. त्यामुळे मी आश्चर्यचकित झालेलो नाही. मी त्यांची भेट घेण्यासाठी 13 महिन्यांपासून वाट पाहत होतो. मात्र, आता त्यांची भेट मी घेणार नाही. मी आता थेट जनतेतून संवाद साधणार आहे.   

दरम्यान, यशवंत सिन्हांनी यापूर्वी अनेकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच ते शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national politics Todays BJP is not like the one in the days of Atalji and Advaniji says Yashwant Sinha