सोनियांच्या अध्यक्षतेखाली समविचारी पक्षांची बैठक; ठाकरेंचीही उपस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-sonia-and-sharad

सोनियांच्या अध्यक्षतेखाली समविचारी पक्षांची बैठक; ठाकरेंचीही उपस्थिती

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरु झाली आहे. त्याप्रकारच्या राजकीय हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून दिसून येत आहेत. मध्यंतरी, शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसवगळता तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु झाली होती. मात्र, या चर्चा फोल ठरल्या. त्यानंतर विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व पश्चिम बंगालमध्ये भाजपला आसमान दाखवणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करतील, अशा देखील चर्चा सध्या रंगत आहेत. त्यामुळे, २०२४ च्या लोकसभेसाठी विरोधक कंबर कसून तयारी करत असल्याचं चित्र निर्माण झालंय. यातच आता आणखी एक घडामोड समोर येतीय. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज शुक्रवारी समविचारी विरोधी पक्षांची एक बैठक बोलावली होती. ही बैठक आज व्हर्च्यूअल पद्धतीने झाली आहे.

हेही वाचा: माझ्या आजोबांचा काय संबंध? राज ठाकरेंनी दिलं शरद पवारांना प्रत्युत्तर

या बैठकीला द्रमुक पक्षाचे एमके स्टालिन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्लाह, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव आणि कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सिताराम येच्यूरी यांनी सहभाग नोंदवला. या बैठकीला समाजवादी पक्षातर्फे कुणीही उपस्थित राहिलं नाही. या बैठकीला भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील उपस्थिती होती.

हेही वाचा: कॅनडाला जाण्यासाठी तब्बल चार देशांना का घालावा लागतोय वळसा?

या बैठकीबद्दल शरद पवार यांनी म्हटलंय की, आपल्या देशातील सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत आवश्यक अशा या बैठकीचं आयोजन करण्यासाठी उचललेल्या पावलांचे मी खरोखरच कौतुक करतो. भारतातील सध्याची परिस्थिती अतिशय निराशाजनक आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत, भारतासारख्या लोकशाही देशासाठी हे एक यातना देणारे चित्र आहे. महागाई, आर्थिक मंदी, कोविड, बेरोजगारी, सीमा विवाद, अल्पसंख्याक समुदायाचा मुद्दा इत्यादी अनेक समस्यांना सध्या देश तोंड देत आहे. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात सध्याचे सरकार अपयशी ठरले आहे. जे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतात; ज्यांना आपल्या देशातील लोकशाही तत्त्वे आणि नीतीमत्ता वाचवण्यासाठी एकत्र काम करायला आवडते त्यांनी एकत्र आले पाहिजे.

एक कालबद्ध कृती कार्यक्रम सामूहिकपणे घेणे आवश्यक आहे. मी ठामपणे असं सुचवू इच्छितो की, या सगळ्या समस्यांना एकावेळी एकत्रित तोंड देण्याऐवजी, आपण सगळ्यांनी मिळून या समस्यांचा सोडवणुकीसाठी प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे आणि देशाच्या कल्याणासाठी एकानंतर एक या समस्या सोडवल्या पाहिजेत.

Web Title: Meeting Of Congress Interim Chief Sonia Gandhi With Opposition Leaders Via Video Conferencing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..