
Mehbooba Mufti : भारतातही विरोधकांच्या अटकेचे प्रयत्न; मेहबूबा मुफ्ती
जम्मू : पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा बेलगाम वक्तव्य केले आहे. यावेळीही त्यांनी पाकिस्तानशी अनावश्यक तुलना केली आहे. पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्ष माजी पंतप्रधान इम्रान खान यांना गजाआड करण्याच्या प्रयत्नात आहे, त्याचप्रमाणे केंद्रातील भाजप सरकार विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्यासाठी केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करीत आहे, असे वक्तव्य मेहबुबा यांनी केले.
पक्षाच्या मुख्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संकटग्रस्त पाकिस्तानमधील घडामोडींबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, पाकमध्ये नवे काहीच चाललेले नाही. येथे भारतातही तसेच घडते आहे.
मनीष सिसोदिया, के. कविता, लालूप्रसाद यादव, शिवसेना आणि इतर पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांना एक तर तुरुंगात टाकले जात आहे किंवा समन्स बजावले जात आहे. पी. व्ही. नरसिंह राव हे सुद्धा तुरुंगात गेले होते, पण ते देशाच्या कायद्यानुसार घडले होते. भाजप मात्र ईडी, सीबीआय अशा संस्थांना हाताशी धरते आहे.
३७० कलम हटविले गेल्यानंतर तसेच राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाल्यापासून जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा दावा करून त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
दरम्यान, ४७ दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधीच्या सरकारने नोकरी दिली होती. आपण त्यांना निलंबित केल्याचे निवेदन नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केले आहे. त्याबाबत मेहबूबा म्हणाल्या की, सिन्हा हे कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा विक्रम नोंदवतील, पण ते इच्छुकांना नोकऱ्या देणार नाहीत. लोकांना नोकऱ्यांवरून काढून टाकले जात आहे, पण नव्या नोकऱ्या कुणालाही दिल्या जात नाहीत. विद्यार्थी परिक्षा देत आहेत, पण गैरव्यवहार होत आहेत.
मेहबुबा मुफ्ती यांनी पँूच येथील नवग्रह मंदिरातील शिवलिंगावर जलाभिषेक केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांनी मंदिराचे संस्थापक आणि पीडीपीचे नेते दिवंगत यशपाल शर्मा यांच्या प्रतिमेवर फुलही वाहिले. दरम्यान, भाजपने मेहबुबा यांच्या मंदिर भेटीवर टीका केली. मेहबुबा यांची नौटंकी असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले.
चौदा मार्च रोजी मेहबुबा या पूँच येथील नवग्रह मंदिरात गेल्या होत्या. तेथे त्यांनी शिवलिंगावर जलाभिषेक केला. त्या म्हणाल्या, की मंदिराची उभारणी पीडीपीचे बडे नेते यशपाल शर्मा यांनी केली. त्यांच्या मुलाला वाटत होते, की मंदिरात यावे.
त्यामुळे आपण मंदिरात गेलो. तेथे मला कोणीतरी पाण्याने भरलेले भांडे दिले. ते परत दिले असते तर चुकीचे ठरले असते. त्यामुळे आपण शिवलिंगावर जलाभिषेक केला आणि प्रार्थना केली.
यापूर्वी मेहबुबा मुफ्ती या २०१७ मध्ये गांदरबल येथील क्षीर भवानी मंदिरात देखील गेल्या होत्या. त्यावेळी त्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री होत्या. दरम्यान, काश्मीरचे भाजपचे प्रवक्ते रणबीर सिंह पठाणिया यांनी मंदिर भेटीवर टीका केली. ते म्हणाले की २००८ रोजी मेहबुबा आणि त्यांच्या पक्षाने अमरनाथ धामसाठी जमीन देण्यास नकार दिला होता.
या जमिनीवर भाविकांसाठी धर्मशाळा उभी करायची होती. आता मंदिराला भेट देणे ही निव्वळ नौटंकी आहे. या पूजेतून त्यांच्या हाती काहीच पडणार नाही. राजकीय नौटंकीतून मिळाले असते तर जम्मू आणि काश्मीर हे समृद्धीचे नंदनवन बनले असते.दुसरीकडे देवबंदचे मौलाना असद कासमी यांनी मेहबुबा यांच्या मंदिर भेटीला आणि जलाभिषेकास विरोध केला.
कासमी म्हणाले, की मेहबुबा यांनी जे काही केले ते चुकीचे आहे. मुफ्ती यांच्या भेटीवर उदेश पाल शर्मा यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, की नोव्हेंबर २०१७ मध्ये या मंदिराचे बांधकाम माझे वडिल दिवंगत यशपाल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते.