मुफ्ती यांचे मानसिक संतुलन बिघडले; विहिंप यांचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 24 October 2020

पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्‍मीरच्या राष्ट्रध्वजाबाबत केलेले विधान हा संसदेचा व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असून त्यांना न्यायालयात खेचू असा इशारा विश्‍व हिंदू परिषदेने दिला आहे.

नवी दिल्ली, ता. २४: पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्‍मीरच्या राष्ट्रध्वजाबाबत केलेले विधान हा संसदेचा व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असून त्यांना न्यायालयात खेचू असा इशारा विश्‍व हिंदू परिषदेने दिला आहे. मुफ्ती यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप विहिंपने केला आहे. जम्मू-काश्‍मीर भाजपने त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याचा इशारा देतानाच त्यांना अटक करण्याची मागणी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे केली आहे.

जगातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्‍मीर-लडाखमध्ये आता भारताशिवाय अन्य झेंडा फडकावू शकत नाही. जम्मू-काश्‍मीरच्या जनतेच्या हृदयात तिरंगा व भारत मातेचाच निवास आहे असे भाजपने म्हटले आहे. जम्मू-काश्‍मीरसह गिलगीट बाल्टिस्तान भारताचा अभिन्न भाग आहे. तो पूर्ण मिळविण्यासाठी भारत सदैव प्रयत्नशील आहे असेही भाजपने म्हटले आहे.

हे वाचा - सरकारचा मोठा निर्णय; लष्करी कँटिनमध्ये विदेशी मद्यासह आयात वस्तू विकण्यास बंदी

चौदा महिन्यांच्या नजरकैदेतून सुटल्यावर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्‍मीरचा झेंडा परत मिळत नाही तोवर इतर कोणताही झेंडा आपण स्वीकारणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर त्या संघपरिवार व भाजपच्या निशाण्यावर आल्या आहेत. विहिंपने मेहबूबा यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे व पाकिस्तान म्हणजे पाकव्याप्त काश्‍मीर नव्हे तर थेट पाकिस्तानात जा, असेही बजावले आहे.

अब्दुल्ला घराणे व मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या वाटा बंद झाल्यानेच अशी भडक वक्तव्ये केली जात असल्याचे सांगून विहिंप नेते विनोदकुमार बन्सल म्हणाले, की त्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. सरकारला डाकूची उपमा देणे हे मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीच करू शकतात. मुफ्ती यांनी पाकिस्तानात जावे. काश्‍मीर मुद्यावर राज्यघटना व संसदेचा तसेच राममंदिर मुद्याचा उल्लेख करून न्यायालयाचा अवमान केल्याने त्यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. काश्मिरी जनतेने कलम ३७० व ३५ अ रद्द केल्याचे स्वागत केले होते, असेही बन्सल म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mehbooba-mufti-statement vhp-bjp-warn-of-fir-and-legal-action