गलवान शहीदांच्या स्मरणार्थ स्मारक; चिनी सैन्याला शिकवला होता धडा

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 3 October 2020

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात हुतात्मा झालेल्या वीस भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराने स्मारक उभारले आहे.

नवी दिल्ली- पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात हुतात्मा झालेल्या वीस भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराने स्मारक उभारले आहे. पूर्व लडाखमधील पोस्ट क्र ः १२० या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आले असून मागील आठवड्यामध्येच त्याचे उद्‌घाटन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या स्मारकावर दर्शनी भागात कोरण्यात आलेल्या ओळींमध्ये हुतात्मा जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले आहे. दरम्यान चीनच्या सैनिकांनी धारदार शस्त्रे आणि काठ्यांचा वापर करत भारतीय जवानांवर हल्ला चढविल्यानंतर त्यांनीही त्याला सडेतोड उत्तर दिले होते. या संघर्षात चीनचे ३५ सैनिक मारल्या गेल्याचे बोलले जाते पण चीन सरकारने अद्याप त्यांची अधिकृत संख्या जाहीर केलेली नाही.

बिहार निवडणूक आखाड्यात युवा वारसदार; नेत्यांची पुढील पिढी अजमावणार नशीब

चीनने मे महिन्यापासून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनचीही मोठी हानी झाल्याचे सांगण्यात येतंय. संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये अभूतपूर्व अशी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. उभय देशांनी मोठ्या प्रमाणात सीमेवर सैनिकांनी तैनाती केली आहे, त्याच बरोबर शस्त्रास्त्रांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी भारताने आपले रणगाडे लडाख भागात पाठवले आहेत. तसेच 14000 फुटांवर आपले सैनिक सज्ज केले आहेत. 

चीनने सीमा भागात आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. मोठ्या प्रमाणात तिबेट भागात सैनिकांची तैनाती करण्यात आली आहे. शिवाय चीनने सीमा भागात बांधकाम कार्य हाती घेतले आहे. त्याअंतर्गत धावपट्टया तयार करण्यात आल्या आहे. चीनने आपली लढाऊ विमाने सज्ज ठेवली आहेत. काही दिवसांपूर्वी चीनने तिबेट भागात युद्ध अभ्यास केला होता. तसेच हवेत मारा करणाऱ्या मिसाईली डागल्या होत्या. एकंदरीत पाहता दोन्ही देशांनी संघर्षाची पूर्ण तयारी करुन ठेवली आहे. संघर्षाने आपले नुकसानच होईल, हे दोन्ही देश जाणून आहेत. त्याचमुळे दोन्ही देशांत कमांडर स्तरावर चर्चेच्या फेऱ्या पार पडत आहेत. पण, चीनने आपले सैन्या मागे घेण्यास टाळाटाळ सुरु केल्याने परिस्थिती जैसे थे आहे.  

कोरोना लस लवकरच मिळणार; ब्रिटनने दिली चांगली बातमी

भारताने आक्रमकपणा दाखवत चिनी कंपनीच्या अनेक अॅप्सवर बंदी आणली आहे. यामुळे चीन बिथरला असून सीमा भागात हालचाली वाढवल्या आहेत. भारताने प्रत्युत्तरासाठी पूर्ण तयारी केली आहे. दुसरीकडे चर्चाही सुरु आहे. भारतीय सैन्याने पैंगोगच्या दक्षिण भागातील तीन टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. या टेकड्या सामरिक दृष्ट्या महत्वाच्या आहेत. कारण, यामुळे भारताला चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A memorial to the martyrs of Galwan chins india face off