गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांसाठीचा मेन्यू ‘डीएफआरएल’मध्ये तयार

पीटीआय
बुधवार, 8 जानेवारी 2020

असा आहे मेन्यू...
अवकाशातील वास्तव्याच्या काळातील अंतराळवीरांचा भोजनाचा मेन्यूही तयार झाला आहे. कर्नाटकातील म्हैसूरस्थित ‘डीएफआरएल’ने ‘गगनयाना’तून अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी एग रोल, व्हेज रोल, इडली सांबार, उपमा, मूग डाळीचा हलवा आणि व्हेज पुलाव असा मेन्यू तयार केला आहे. अंतराळवीर आपल्या सोबत द्रवरूपात काही पदार्थ घेऊन जाणार आहेत. पाणी आणि फळांचा रसही ते सोबत नेणार आहेत.

बंगळूर - गगनयान ही मानवाचा समावेश असलेली भारताची पहिली अवकाश मोहीम असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) या मोहिमेची सध्या वेगाने तयारी सुरू आहे. या मोहिमेतील अवकाशवीरांना भारतीय पदार्थांचा अवकाशातही आस्वाद घेता येणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इडली सांबार, उपमा, व्हेज पुलाव आणि एग रोल असा मेन्यू असणार आहे. म्हैसूरस्थित संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेने (डीएफआरएल) खास अंतराळवीरांसाठी या पदार्थांच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) भाग असलेल्या ‘डीएफआरएल’कडे गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या अवकाशातील भोजन आणि इतर साहित्य तयार करण्याची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे ‘गगनयान’साठी ‘इस्रो’समोर २०२२ची डेडलाइन आहे. त्यामुळे गगनयान मोहिमेची तयारी वेगाने सुरू आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या चार भारतीय अवकाशवीरांची निवड झाली असून, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात हे चौघे प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना होणार आहेत.

अन्न गरम करण्यासाठीही उपकरणे
अवकाश सफरीसाठीचे हे विशेष पदार्थ ‘डीएफआरएल’च्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले आहेत. अनेक दिवसांचे संशोधन आणि विविध प्रयोगानंतर अंतराळवीरांसाठीचे अन्न आणि खाण्या-पिण्यासाठीच्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. अवकाशात गुरुत्वाकर्षण कमी होत जाते किंवा नसतेच. ही बाब ध्यानात घेऊन अन्नपदार्थ गरम करण्यासाठी विशेष उपकरणांची निर्मितीही ‘डीएफआरएल’ने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: menu ready for Astronauts prepared in DFRL