
Agnipath Scheme : अग्निवीरांची पहिली तुकडी सेवेत
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या राबवायला सुरुवात केल्याचे आज स्पष्ट झाले. अग्निवीरांची पहिली तुकडी आज देशसेवेत सामील झाली. नौदल प्रमुख ॲडमिरल हरीकुमार यांनी ही माहिती दिली आहे.
कारगिल पुनरावलोकन समितीच्या अहवालात सशस्त्र दलातील वयोमर्यादा खाली आणण्याची गरज असल्याची शिफारस करण्यात आल्याचे सांगून हरीकुमार म्हणाले, की कारगिल युद्धाच्या वेळी भरतीचे सरासरी वय ३२ वर्षे होते आणि ते २५ वर्षांपर्यंत खाली आणण्याची शिफारस केली गेली होती.
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा रिपोर्ट समोर आला आहे. तीन हजार अग्निवीर नौदलात सामील झाले असून या अग्निवीरांमध्ये ३४१ महिला अग्निवीरांचा समावेश आहे, अशी माहिती ॲडमिरल हरीकुमार यांनी दिली आहे. पुढील वर्षी २०२३ मध्ये अग्निवीर भरतीची प्रक्रिया अधिक वेगवान करून जास्तीत जास्त अग्निवीरांची भरती सैन्य दलाच्या तिन्ही शाखांमध्ये केली जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. ‘भारताची नौदल क्रांती: उदयोन्मुख सागरी शक्ती’ या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले, की पुढील वर्षापासून महिला अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात येईल.
सर्व सैन्याच्या तीनही दलांतील भरती सर्वांसाठी खुली राहणार आहे. ‘अग्निपथ’ ही एक शानदार योजना आहे, ‘विस्तृत विचारमंथन’ आणि ‘विस्तृत अभ्यास’ केल्यानंतर याबाबतचा अंतिम अहवाल लष्कराने सादर केला होता. २०२० मध्ये अग्निवीर ही कल्पना समोर आली आणि ती प्रत्यक्षात येण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागली.