
Brij Bhushan Singh : बृजभूषण यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई
नवी दिल्लीः भारतीय कुस्ती महासंघावर झालेल्या आरोपानंतर देशाच्या क्रीडा मंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. WFI चे असिस्टंट सेक्रेटरी विनोद तोमर यांना निलंबित करण्यात आलेलं आहे.
पैलवानांनी कुस्ती महासंघावर अनेक आरोप केलेले आहेत. त्यामुळे WFI च्या अध्यक्षांना बरखास्त करा, अशी मागणी होत आहे. त्यातच क्रीडा मंत्रालयाने तोमर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच क्रीडा मंत्रालयाने WFIची सर्व कार्यप्रणाली थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरूद्ध ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपुटूंनी मानसिक आणि लैंगिक छळाचे आरोप करत आंदोलन पुकारले आहे. विनेश फोगाट, साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्याविरूद्ध लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या आंदोलनात महिला कुस्तीपटूंसह बजरंग पुन्या आणि रवी दहिया यांच्यासारख्या पुरूष कुस्तीपटूंनी देखील बृजभूषण सिंह यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने WFI अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. बृजभूषण सिंग यांची समितीमार्फत कसून तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावरील आरोपांची खातरजमा करुन कारवाई होऊ शकते.