आता शहा यांच्या हाती ‘मिशन बिहार'

भाजप हायकमांडला ‘अपेक्षित' परिणाम न दिसल्याने आता शहा स्वतः बिहार मुक्कामी २ दिवस जाणार आहेत.
Amit Shah
Amit Shahesakal

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली असताना व भाजप घाडीतून नितीशकुमार यांच्यासारखा वजनदार नेता बाहेर पडला असताना या राज्यातील पक्षसंघटनेत पुन्हा चैतन्य आणण्याची जबाबदारी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतःकडे घेतली आहे. शहा गणेशोत्सवानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बिहार दौऱयावर जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ते जयपूरचाही दौरा करून राजस्थानातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतील.

बिहारमधील सत्ता गेल्यावर पार्श्वभूमीवर शहा यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पक्षनेत्यांबरोबर दीर्घ मंथन केले होते. नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह पुन्हा हातमिळवणी करून महाआघाडी सरकार स्थापन केल्यानंतर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार शहा यांनी पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह सुशीलकुमार मोदी, राधामोहन सिंह, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यासह बिहार भाजपच्या नेत्यांना टिप्स दिल्या होत्या. त्यानंतर नड्डा यांनीही पाटणा दौरा केला. पण त्यातून भाजप हायकमांडला ‘अपेक्षित' परिणाम न दिसल्याने आता शहा स्वतः बिहार मुक्कामी २ दिवस जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यानंतर राजदच्या कलंकित मंत्र्यांविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडण्यासाठी बिहार भाजपमध्ये नवा जोश येईल असे मानले जाते.

बिहारमध्ये आता भाजपच्या प्रमुख नेत्यांना पक्षसंघटना मजबूत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नितीशकुमार-तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकार कधीही कोसळू शकते असा राज्यातील पक्षनेत्यांचा होरा आहे. बिहारमध्ये गाव पातळीपर्यंत भाजपचे जाळे आहे. गेल्या ८ वर्षात संघपरिवारानेही तेथे बऱ्यापैकी विस्तार केला आहे. मात्र राज्यात पक्षाकडे राष्ट्रीय पातळीवरील मजबूत नेता नाही. सुशीलकुमार मोदी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत आणले तरी अजूनही ते नितीशकुमार यांच्या जवळचे असल्याचा संशय पक्षनेते खासगीत व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य रणनीतीकार असलेले शहा यांचा आगामी दौरा उत्सुकतेचा विषय राहणार आहे. शहा बिहारमधील सीमांचल भागालाही भेट देतील त्यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमात ते पूर्णिया आणि किशनगंज जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याबरोबरच शहा यांच्या जाहीर सभाही बिहारमध्ये होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com