गर्भात होतं पोर, पण ते समजले चोर; फक्त अश्रू...

वृत्तसंस्था
Monday, 2 September 2019

माझी बहिण गर्भवती असून तिला नागरिक बेदम मारहाण करत होते. बोलता व ऐकता येत नसल्यामुळे ती फक्त रडत होती.

नवी दिल्ली : एक मूकबधिर आणि कर्णबधीर असलेली महिला पाच महिन्यांची गर्भवती. पण, ती मुलं पळवणारी असल्याचे समजून 10-15 जणांनी मिळून तिला बेदम मारहाण केली. ऐकता येत नव्हते अन् बोलताही येत नसल्यामुळे महिलेला बेदम मारहाणीला सामारे जावे लागले. महिलेवर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका (वय 25) हिचे गेल्या वर्षी लग्न झाले असून, ती पाच महिन्यांची गर्भवती आहे. शहरातील हर्ष विहार भागामध्ये 27 ऑगस्ट रोजी मुलं पळविणाऱया टोळीतील असल्याच्या संशयावरून तिच्यावर 10-15 जणांनी हल्ला केला. तिला बेदम मारहाण करण्यात आली. याबाबतची माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून, हल्ला करणाऱयांपैकी दीपक (27), शकुंतला (52) आणि ललित कुमार (29) या तीन जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, महिलेला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रियांकाचा भाऊ संदीप कुमार म्हणाला, 'प्रियंकाचे गेल्या वर्षी लग्न झाले आहे. विवाहानंतर ती फरिदाबादला स्थायिक झाली होती. मात्र, ती अचानक ती बेपत्ता झाल्याचे तिच्या सासरच्या मंडळींनी आम्हाला कळवले. त्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली होती. तक्रारीनंतर 10 दिवसांनी प्रियंकावर हल्ला झाल्याचा व्हिडिओ आमच्या मित्राने पाहिला. यानंतर आम्ही तातडीने पोलिसांशी संपर्क केला.'

'माझी बहिण गर्भवती असून तिला नागरिक बेदम मारहाण करत होते. बोलता व ऐकता येत नसल्यामुळे ती रडत होती, तरीही नागरिकांना तिची दया आली नाही. तिला एका कोपऱया बसवण्यात आले असून, ती पाणी मागत आहे तर काहीजण मारहाण करताना प्रश्नांचा भडीमार करत आहेत. मारहाणीचा व्हिडिओ पाहून आमच्या अश्रूंचा बांध फुटला,' असेही संदीप कुमार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mob beats up pregnant woman over child lifting rumours