मोदी-शहांचा 'मास्टरस्ट्रोक'; दोन वर्षांपूर्वीच आखली रणनीती

मोदी-शहांचा 'मास्टरस्ट्रोक'; दोन वर्षांपूर्वीच आखली रणनीती

नवी दिल्ली : नेता व नीती (धोरण) पक्के असलेले भाजप नेतृत्व वारंवार लोकसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा जो दावा करीत आहे; त्यामागे गेल्या किमान दोन वर्षांची पडद्याआडची प्रचंड रणनीती आहे. भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पक्षनेतृत्वाने अतिशय काळजीपूर्वक व विरोधकांच्या संभाव्य एकीचा अंदाज घेऊन रणनीती आखली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा या दोन्ही प्रमुख नेत्यांनी लाखो-कोट्यवधी पक्षकार्यकर्त्यांच्या मदतीने राबविलेल्या प्रचार मोहिमेचा परिणाम 23 मे रोजी दिसेल. दिल्लीत आता विरोधकांची मोट बांधणाऱ्यांपैकी एकही पक्षनेता भाजपच्या नियोजनबद्ध आखणीच्या जवळपासही जाऊ शकत नाही, असा सत्तारूढ पक्षाचा दावा आहे. उपलब्ध साधनांचा चपखल व जास्तीत जास्त उपयोग करण्याबाबत कॉंग्रेससह इतर मोदीविरोधक आमच्या कित्येक कोस मागे आहेत, हा अमित शहा यांचा दावा आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार, शहा यांनी मोदींच्या मार्गदर्शनाखाली जी रणनीती आखली होती; तीत घटणाऱ्या जागा, बसणारा फटका, जागा वाढू शकतील अशी राज्ये आदी बाबींचा बारकाईने विचार केला होता. दीड वर्षापासून देशातील साऱ्या विधानसभा मतदारसंघांत भाजपने तीन हजारांहून जास्त पूर्णवेळ कार्यकर्ते फिरत ठेवले होते.

जोडीला संघाचे विस्तारलेले जाळे होतेच. 83 हजार 661 बूथवर भाजपची संघटनात्मक बांधणी पक्की होती. "फिर एक बार मोदी सरकार', "मै भी चौकीदार'सह 14 कार्यक्रम या काळात राबविले गेले. कोट्यवधी कार्यकर्त्यांद्वारे गेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतसंख्येपेक्षा तिप्पट लोकांशी पक्षाने यंदा संवाद साधला. बंगाल व केरळमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांना तर "देश के लिऐ मिटेंगे' या धर्तीचा संकल्प देऊन भाजपने प्रचारात उतरविले होते. भाजपचा जाहीरनामा तयार करण्यासाठीही प्रचंड मोठी मोहीम राबविण्यात आली होती. सोशल मीडियावरून आलेल्या दोन कोटी 38 लाख सूचना मिळाल्या. देशभरातील 161 संवाद केंद्रांच्या 15,682 कार्यकर्त्यांनी विविध योजनांच्या 24.81 कोटी लाभार्थींबरोबर थेट संपर्क साधला. केवळ त्या काळात 9.38 कोटी एसएमएस पाठविले गेले.

प्रचार मोहीम सुरू झाल्यावर पंतप्रधानांनी स्वतः प्रचंड संख्येने सभा घेतल्या. मोदींच्या प्रत्येक जाहीर सभेतील गर्दीत भाजप कार्यकर्ते फक्त जनतेचा फीडबॅक घेण्याचे काम करीत. त्यांच्या फीडबॅकनंतर त्या परिसरातील 4 ते 7 लोकसभा मतदारसंघांतील रणनीतीबाबत प्रसंगी फेरविचार केला जाई व त्याची अंमलबजावणीही होत असे.

शहा यांनी 312 जागांवर जाहीर सभा घेतल्या. याशिवाय, योगी आदित्यनाथांसह सारे भाजप मुख्यमंत्री, राजनाथसिंह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज आदी नेतेही आक्रमकपणे प्रचार मोहिमेला वेळोवेळी बळ देत गेले. 

तयारी : विरोधकांची आणि भाजपची

23 मे 2019 रोजी लागणाऱ्या निकालांनंतर भाजप म्हणजे मोदी नक्की हरणार, या सूत्राभोवती दिल्लीत विरोधकांची वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. मात्र, भाजपसूत्रांच्या माहितीनुसार पक्षनेतृत्वाने लोकसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचीही तयारी व आखणी सुरू केली असून, साधारणतः 27 किंवा 28 मे (सावरकर जयंती) रोजी नव्या सरकारचा शपथविधी होईल.

त्याआधी 26 मे रोजी (रविवारी) मोदी नव्या पर्वातील पहिली "मन की बात' करतील. मोदींनी 2014 मध्ये सार्क देशांच्या नेत्यांना शपथविधीला बोलाविले होते. यंदा मोदी अतिशय प्रभावशाली मुस्लिम देशांच्या नेत्यांना खास निमंत्रण देऊ शकतात, अशी माहिती समजली. अनेक मुस्लिम नेते नव्या सरकारच्या शपथविधीसाठी दिल्लीत जमतील. पण, त्यात दारिद्य्ररेषेखालील पाकिस्तानचा नेता कदाचित नसेल, असे सांगून भाजप नेते पुढच्या पाच वर्षांतील मोदींच्या "पाक-बलुचिस्तान धोरणा'बाबत सूचक भाष्य करतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com