esakal | 'कोरोनाच्या संकटात मोदींमुळे मोठा अनर्थ टळला'; आरोग्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi1.jpg

सभागृहामध्ये निवेदन सादर करताना आरोग्यमंत्र्यांनी सरकारच्या उपाययोजनांची जोरदार पाठराखण केली.

'कोरोनाच्या संकटात मोदींमुळे मोठा अनर्थ टळला'; आरोग्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना भारतात सरकारने वेळीच उपाययोजना केल्यामुळे तब्बल ३७-३८ हजार जणांचा जीव वाचविण्यात यश आले. तर १४.२९ लाख लोकांना कोरोना संसर्ग टाळण्यात सरकार यशस्वी ठरले, असा दावा आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज लोकसभेमध्ये केला.

कोरोना महामारीवर संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारतर्फे सविस्तर निवेदन आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सादर केले. प्रदीर्घ निवेदन निम्मे वाचल्यानंतर लोकसभाध्यक्षांच्या सूचनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी ते सभापटलावर मांडले. देशभरात कोरोना संकटाने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर यावर चर्चेची मागणी विरोधकांकडून होते आहे. त्यापार्श्वभूमीवर सभागृहामध्ये निवेदन सादर करताना आरोग्यमंत्र्यांनी सरकारच्या उपाययोजनांची जोरदार पाठराखण केली. या उपायोजनांचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. मात्र यास विरोधी बाकांवरून जोरदार आक्षेप घेण्यात आला.

कोरोना लढाईत अप्रतिम काम केल्याबद्दल मोदींनी माझं कौतुक केलं- डोनाल्ड ट्रम्प

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की देशातील ९२ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून फक्त ५.८ टक्के रुग्णांनाच ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता आहे. तर केवळ १.७ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज अखेरपर्यंत ४५,६२,४१४ रुग्ण असून ७६२७१ रुगणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर अवघा १.६७ टक्के असल्याकडे डॉ. हर्षवर्धन यांनी लक्ष वेधले. सरकारने कोरोना संकट आव्हान म्हणून स्वीकारले. देशव्यापी टाळेबंदी (लॉकडाउन) हा धाडसी निर्णय होता, असाही दावा त्यांनी केला. यामुळे तब्बल ३७ ते ३८ हजार जणांचे प्राण वाचविणे शक्य झाले. आतापर्यंत ३५.४२ लाख रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ७७.६५ टक्के असल्याचेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

पीपीईमध्ये भारत स्वावलंबी

सद्यस्थितीत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशा, आसाम, केरळ आणि गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण असून मृत्यूमुखी पडलेल्यांची सर्वाधिक संख्या याच राज्यांमध्ये असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर, कोरोना संक्रमणापासून रक्षणासाठी लागणाऱ्या पीपीई किटच्या उत्पादनात भारत स्वावलंबी झाल्याचाही दावा आरोग्य मंत्र्यांनी केला.