मोदी स्वयंपाक करायचे.. आईच्या मायेनं आमच्यावर प्रेमही करायचे!

तेजश्री कुंभार
बुधवार, 29 मे 2019

आम्ही एकूण पाच भावंडे. आमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून बेताची असली तरी आमच्यात असणाऱ्या प्रेमबंधाला घट्ट करण्याचे काम नरेंद्रभाईंनी केले आहे.

पणजी : आम्ही एकूण पाच भावंडे. आमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून बेताची असली तरी आमच्यात असणाऱ्या प्रेमबंधाला घट्ट करण्याचे काम नरेंद्रभाईंनी केले आहे. आमची आई अशक्‍त असल्याने सतत आजारी असे. तेव्हा स्वयंपाक करण्यापासून ते घर सांभाळण्यापर्यंतचा सर्व भार नरेंद्रभाई उचलत.

आम्हा चौघा भावडांच्या प्रेमापोटी त्यांनी प्रसंगी आईची भूमिका बजावत आम्हाला गोंजारले...अशा आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या भगिणी वासंतीबेन मोदी गहिवरल्या. गोवा भेटीवर आलेल्या वासंतीबेन यांच्याशी सकाळ न्यूज नेटवर्कने संपर्क साधला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्या भरभरून बोलल्या.

वासंतीबेन यांना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशनतर्फे द प्राईड ऑफ इंडिया या पुरस्काराने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्या म्हणाल्या, लहान असताना नरेंद्र अत्यंत संमिश्र स्वभावाचे होते. शाळेतून परतताना परस्पर तलावात पोहायला जाणे आणि इतर खोडकर गोष्टीही ते करीत असत. मगरीचे पिल्लू आवडले म्हणून नरेंद्रभाईंनी एकदा त्याला पकडून आणले होते. या पिल्लाबाबत आईला कळले असता तिने खडसावले. त्यानंतर त्यांनी ते पिल्लू परत तलावात सोडले. ते शासक भावाच्या भूमिकेतही असायचे. त्यांना कामाच्या बाबतीत कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा खपत नसे. त्यांच्या स्वभावातील हा शासकपणा नंतर अत्यंत काटेकोर पद्धतीचा होत गेल्याचे त्या म्हणाल्या.  

घरी असणारी हलाखीची परिस्थती आणि काबाडकष्ट करून तसेच संघर्ष करून भाईंनी मिळवलेले पंतप्रधानपद आणि देशसेवेचा सुरू केलेला अविरत प्रवास पाहिला तर अभिमानाने उर भरून येतो. नरेंद्रभाईंसोबत अत्यंत कमी राहण्याचा योग आला. कारण वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी घर सोडले. त्यानंतर त्यांनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले. रक्षाबंधन आणि भाऊबिजेदिवशी त्यांची भेट होई, मात्र आता तीही दुर्मिळ झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते रक्षाबंधनदिनी पहिली राखी माझ्याकडून बांधून घेत आणि नंतर सार्वजनिक रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी जात असल्याचे वासंतीबेन म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi did the cooking and Love Like Mother says Vasantiben Modi