
Modi Government’s Festive Season Relief Through GST Council: सणासुदीच्या काळात मोदी सरकारने देशभरातील सर्वसामान्य जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. आज दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी कॉन्सिलच्या ५६ व्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आणि अनेक मोठ्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली गेली.
या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच जीएसटी स्लॅब असतील. याचा अर्थ उर्वरीत दोन म्हणजेच १२ टक्के आणि २८ टक्के हे जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. परिणामी त्यामध्ये समाविष्ट असलेल्या बहुतेक गोष्टी फक्त दोन मंजूर टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. तर, लक्झरी आणि आरोग्यास हानिकारक वस्तूंसाठी एक स्वतंत्र ४० टक्क्यांचा स्लॅब मंजूर करण्यात आलेला आहे. या जीएसटी बैठकीतील निर्णयानंतर आता नेमक्या कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, हे आपण जाणून घेऊयात.
यूएचटी दूध, छेना पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा यांचा आता शून्य जीएसटी स्लॅबमध्ये समावेश झालेला आह, त्यावर कोणताही जीएसटी आकारला जाणार नाही. याशिवाय, सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, शॅम्पू, साबण, तेल आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या इतर घरगुती वस्तूंव्यतिरिक्त, नमकीन, पास्ता, कॉफी, नूडल्सवर आता केवळ ५ टक्के जीएसटी आकारण्यात येईल.
याशिवाय कार, बाईक, सिमेंटवर आता २८ टक्के ऐवजी १८ टक्के टॅक्स लागू होईल. तर टीव्हीवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. याचबरोबर ३३ जीवनरक्षक औषधी जीएसटीच्या कक्षेतून वगळण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तीन कर्करोगाच्या औषधांचाही समावेश आहे. तर सुपर लक्झरी वस्तूंना ४० टक्क्यांच्या विशेष स्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये पान मसाला, सिगारेट, गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ, बीडी आणि फ्लेवर्ड कार्बोनेटेड पेये यांचा समावेश आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, ‘’आमचे लक्ष देशातील सामान्य माणसावर आहे. शेतकऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत सर्वांना लक्षात घेऊन स्लॅब कमी करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि बैठकीत सहभागी असलेल्या सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी या निर्णयाचे समर्थन केले. काळाची मागणी समजून घेत, सर्वांनी या प्रस्तावाला मंजुरी देण्यास पूर्ण सहमती दर्शविली.’’
जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेतलेले सर्व निर्णय २२ सप्टेंबरपासून लागू केले जातील, म्हणजेच या तारखेपासून सर्व गोष्टी स्वस्त होतील. जीएसटी सुधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी केली होती, त्यानंतर ही पहिलीच परिषदेची बैठक होती ज्यामध्ये आज मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.