मोदी सरकारची मोठी घोषणा; १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रत्येकाला मिळणार घर!

वृत्तसंस्था
Thursday, 21 January 2021

गृहमंत्री शहा यांनी गुरुवारी अहमदाबादमधील थलतेज-शिलाज भागाला जोडणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरील ओव्हरब्रिजचे व्हर्चुअली लोकार्पण केलं. ​

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार पुढील वर्षी १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी (ता.२१) दिले. अहमदाबादमधील शिलाज येथील १ किमी ओव्हरब्रिजच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. 

शहा म्हणाले, "भाजप सरकार देशाच्या ग्रामीण तसेच शहरी भागात गृहनिर्माण प्रकल्प राबवित आहे. पुढील वर्षी १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी घर उपलब्ध करुन दिले जाईल, याचा मला विश्वास आहे. आतापर्यंत मोदी सरकारने १० कोटीहून अधिक परवडणारी घरे उपलब्ध करुन दिली आहेत."

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणाचा इतिहास; कुणी किती शब्दांत आणि मिनिटांत भाषण आटोपलं?

"पंतप्रधान मोदी यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत १३ कोटीहून अधिक गरीब कुटुंबांसाठी गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच देशातील सर्व खेड्यांना वीज उपलब्ध करून दिली आहे. आता आम्ही प्रत्येक घरात पाणी जोडणी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करीत आहोत." भाजप पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत देशातील एकही घर पाणी जोडणीपासून वंचित राहणार नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले. 

गृहमंत्री शहा यांनी गुरुवारी अहमदाबादमधील थलतेज-शिलाज भागाला जोडणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरील ओव्हरब्रिजचे व्हर्चुअली लोकार्पण केलं. यावेळी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल घटनास्थळी उपस्थित होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे एक लाख रेल्वे क्रॉसिंग विलग करण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे त्याठिकाणी ओव्हरब्रिज उभारण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत राज्य सरकार ५० टक्के आणि केंद्र सरकार ५० टक्के खर्च करणार असून रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे.

हे वाचा - सर्वोच्च न्यायालयही आता शेतकऱ्यांच्या भूमिकेवर नाराज

गांधीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शहा यांनी मतदारसंघातील विकासकामांची वेळीच दखल घेतली, त्याबद्दल उपमुख्यमंत्री पटेल यांनी शहा यांचे आभार मानले. कामाच्या व्यापामुळे मला मतदारसंघात वारंवार येणे शक्य होत नाही, पण पटेल लोककल्याणकारी कामांना प्राधान्य देतील, याची मला खात्री आहे, असं शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi government to provide a home to everyone by 15 August 2022 says Amit Shah