पंतप्रधान मोदींवर 'सहारा'ची लक्ष्मीकृपा

महेश शहा : सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

मेहसाणा, (गुजरात) : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट पंतप्रधान मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. नोटाबंदीच्या माध्यमातून गरिबांना लक्ष्य केले जात असून, हा निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्याविरोधात नाही. श्रीमंतांचे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी मोदी यांनी नोटाबंदी केली. "सहारा' कंपनीने मोदींना कोट्यवधी रुपये दिले. सहा महिन्यांमध्ये नऊ वेळेस हे पैसे देण्यात आले. "सहारा'मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डायरीमध्ये या पैशांची देवाणघेवाण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, असा घणाघाती आरोप राहुल यांनी येथे प्रचार सभेत केला.

राहुल म्हणाले, ""पैशांची देवाणघेवाण झाल्याचे पुरावे असतानाही मोदी यांच्यावर कारवाई का केली जात नाही? "सहारा'च्या डायरीची चौकशी व्हायला हवी; तसेच मोदींचीही चौकशी होणे गरजेचे आहे. 22 नोव्हेंबर 2014 रोजी "सहारा' कंपनीवर छापे टाकण्यात आले. प्राप्तिकर विभागानेच दिलेल्या माहितीनुसारच अडीच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांना देण्यात आले होते.''
पंतप्रधान मोदी यांना विरोध करणाऱ्यांना कॉंग्रेस पाठिंबा देईल. शेतकरी "चेकबुक'च्या माध्यमातून नाही; तर रोकड देऊन बियाणे खरेदी करतो. कोणत्याही गोष्टींचा इव्हेंट करणे मोदींना चांगले जमते. मोदींनी बनावट नोटांवरून आपला मोर्चा आता "कॅशलेस'कडे वळविला आहे. आधी काळ्या पैशाच्या गोष्टी केल्या आणि नंतर दहशतवादाच्या. जनतेचा पैसा मोदींनी जाळून टाकला. मोदींनी जनतेवरच बॉंबगोळे टाकले आहेत, असेही राहुल यांनी स्पष्ट केले.
.....
सर्व पैसा काळे धन नाही
दररोज शेतकरी आत्महत्या करत असून, त्यांचे नातेवाईकदेखील भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. नोटाबंदी हे देशातील 99 टक्के लोकांविरोधात उचलण्यात आलेले पाऊल आहे. काळे धन केवळ एक टक्का लोकांकडे आहे. देशातील संपूर्ण पैसा हा काळा पैसा नसून सगळा काळा पैसा हा रोकड स्वरूपातदेखील उपलब्ध नाही. राज्यामध्ये शांततेच्या मार्गाने चालणारे पटेल आंदोलन भाजप सरकारने चिरडून टाकले. आंदोलनकर्त्या महिला आणि मुलांना जबर मारहाण करण्यात आली. येथे दलितांनाही मारले जाते. ही मंडळी भीतीच्या छायेमध्ये जगत आहेत. स्वित्झर्लंड सरकारने काळ्या पैसेवाल्यांची नावे केंद्र सरकारकडे पाठविली असतानाही सरकार ती नावे संसदेमध्ये का जाहीर करत नाही, या लोकांना का वाचविले जात आहे, असा सवालही राहुल यांनी केला.

राहुल गांधी यांनी केलेले आरोप निराधार असून, सर्वोच्च न्यायालयाने ते यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. राहुल यांनी बोलण्यापूर्वी अभ्यास करायला हवा. राहुल हे एक उथळ राजकीय नेते आहेत. त्यांचाही केजरीवाल झाला आहे.
श्रीकांत शर्मा, भाजप नेते

असा पोचला मोदींना पैसा
30 आक्‍टोबर 2013... अडीच कोटी रूपये
12 नोव्हेंबर 2013...पाच कोटी रूपये
27 नोव्हेंबर 2013... अडीच कोटी रूपये
29 नोव्हेंबर 2013... पाच कोटी रूपये
6 डिसेंबर 2013... पाच कोटी रूपये
19 डिसेंबर 2013... पाच कोटी रूपये
13 जानेवारी 2014... पाच कोटी रूपये
28 जानेवारी 2014... पाच कोटी रूपये
22 फेब्रुवारी 2014... पाच कोटी रूपये

याशिवाय 19 डिसेंबर 2013 रोजी "बिर्ला ग्रुप'ने
बारा कोटी रुपये मोदींना दिल्याचा आरोपही राहुल यांनी केला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: modi received kickbacks from sahara group