
राहुल गांधी यांच्या विधानामुळं संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी (BJP MLA Purnesh Modi) यांनी केला होता.
Modi Surname Case : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधींना सुनावली दोन वर्षांची शिक्षा
'चोरों का सरनेम मोदी क्यो होता है…' काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयानं (Surat Sessions Court) राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
तसंच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते. कोर्टानं जामीन दिल्यामुळं राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतील हे प्रकरण आहे. राहुल गांधी यांच्या विधानामुळं संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी (BJP MLA Purnesh Modi) यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती. चला मग, जाणून घेऊया कोण आहेत पूर्णेश मोदी..
कोण आहेत पूर्णेश मोदी?
नाव : पूर्णेश मोदी
जन्मतारीख : 22 ऑक्टोबर 1965
जन्म ठिकाण : सुरत
वैवाहिक जीवन : विवाहित
पत्नीचं नाव : श्रीमती बिनाबेहन
राज्याचं नाव : गुजरात
शिक्षण : पदवी, बीकॉम, एलएलबी
पक्षाचं नाव : भारतीय जनता पार्टी
मतदारसंघ : सुरत पश्चिम
व्यवसाय : वकील
किशोर भाईंच्या निधनानंतर पूर्णेश मोदींना मिळाली उमेदवारी
सुरतच्या अडाजन भागात पूर्णेश मोदी कुटुंबासह राहतात. गुजरातच्या तेराव्या विधानसभेची (2013-17) पोटनिवडणूक जिंकून ते प्रथमच सभागृहात पोहोचले. 2013 साली तत्कालीन आमदार किशोर भाई यांचं आजारपणामुळं निधन झालं होतं. त्यानंतर पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत भाजपनं पूर्णेश मोदींना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले.
पूर्णेश मोदी भाजपचे एकमेव उमेदवार
त्यानंतर 2017 च्या विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा पूर्णेश मोदी हे एकमेव भाजपचे उमेदवार होते. निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजयाचा झेंडा फडकवला. पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा सुरतमधील लोकांचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो. पूर्णेश मोदी यांनी 12 ऑगस्ट 2016 ते 25 डिसेंबर 2017 या कालावधीत गुजरात सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीचे सदस्य म्हणून संसदीय सचिवाची भूमिका पार पाडली होती.
विधानसभा निवडणुकीत पूर्णेश मोदींना मिळाली 1 लाख मतं
याआधी ते सुरत महापालिकेचे नगरसेवक होते. 2000-05 मध्ये ते महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते होते. याशिवाय, ते 2009-12 आणि 2013-16 मध्ये सुरत नगर भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पूर्णेश मोदींना 1 लाख 11 हजार 615 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार इक्बाल दाऊद पटेल यांना केवळ 33 हजार 733 मतं मिळाली होती.