मोदीजी घाबरु नका, चीनने आपला भूभाग बळकावल्याचं जनतेला सांगा- राहुल गांधी

वृत्तसंस्था
Friday, 26 June 2020

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदींनी चीनबाबत नेमकं काय घडलं आहे ते खरं सांगावं. भारतीय जनतेला सत्य जाणण्याचा हक्क आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली असेल तर मोदींनी जनतेला ते स्पष्ट सांगावं. काहीही लपवू नये. चीनसोबत आपण एकत्र मिळून लढू, असं ते म्हणाले आहेत.

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदींनी चीनबाबत नेमकं काय घडलं आहे ते खरं सांगावं. भारतीय जनतेला सत्य जाणण्याचा हक्क आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली असेल तर मोदींनी जनतेला ते स्पष्ट सांगावं. काहीही लपवू नये. चीनसोबत आपण एकत्र मिळून लढू, असं ते म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी याबाबत व्हिडिओ संदेश जारी केला आहे.

भारताचे भूभाग आपल्या नकाशावर दाखवल्यानंतर नेपाळची आता नवी खेळी
गांधींनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. पंतप्रधान म्हणतात की, हिंदुस्थानचा इंचभरदेखील भूभाग कोणीही घेतलेला नाही; परंतु कानावर येणाऱ्या गोष्टी वेगळ्याच आहेत. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमधून दिसते आहे. लडाखची जनता सांगते आहे. लष्कराचे निवृत्त जनरल सांगत आहेत, की चीनने एक नव्हे; तर तीन ठिकाणी आपला भूभाग बळकावला आहे. पंतप्रधानांना आता तरी खरे बोलावे लागेल. देशाला सांगावे लागेल. घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधानांनी उघडपणे सांगावे; परंतु हुतात्मा झालेल्या जवानांना निःशस्त्र कोणी पाठवले. पंतप्रधानांनी यावरही न घाबरता बोलावे. 

पूर्व लडाखच्या गलवान भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते, तर चीनचे 43 जवान शहीद झाल्याचा दावा भारत सरकारकडून करण्यात आला आहे. चीनने 5 मे रोजी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. तेव्हापासून भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं उपग्रह छायाचित्रातून स्पष्ट होत आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. विशेष करुन राहुल गांधी यांनी दररोज ट्विट करुन मोदींवर निशाणा साधला आहे.

मी इंदिरा गांधी यांची नात, कारवाईला घाबरत नाही; प्रियांका गांधींचं सणसणीत उत्तर
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या मुद्द्यावरुन भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे.  चीनप्रश्‍नी केंद्र सरकार वस्तुस्थिती दडवून ठेवत असून, यावर जाणीवपूर्वक स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नसेल, तर मग २० जवान कसे हुतात्मा झाले, असा सवालही त्यांनी सरकारला केला. 

काँग्रेसच्या दैनंदिन वार्तालापादरम्यान पक्षनेते, नेते व माजी संरक्षण राज्यमंत्री पल्लम राजू यांनी आज दावा केला की, चीनने देप्सांग भागात १८ किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या वाय जंक्शनमध्ये झालेली ही घुसखोरी देशाच्या सरहद्दीला मोठा धोका आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी भारतीय हद्दीत चीनची घुसखोरी झाली नसल्याचा दावा केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modiji don't be afraid tell the people that China has seized our territory said Rahul Gandhi