
दिल्लीत पुन्हा दुधाची दरवाढ मदर डेअरीचा निर्णय
नवी दिल्ली - दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरातील प्रमुख दूध उत्पादक असलेल्या मदर डेअरीचे दूध उद्यापासून (मंगळवार,१७ डिसेंबर) प्रतिलिटर दोन रुपयांनी महागणार आहे. मदर डेअरीने वेगवेगळ्या लंगड्या सबबी पुढे करून यंदाच्या वर्षभरात पाचव्यांदा दूध दरवाढ केली आहे.
दुधापाठोपाठ दही, पनीर, खवा, तूप व दुधापासून बनविलेली मिठाई यासारख्या पदार्थांचीही दरवाढ आपोआप होत असल्याने दुधाची वरवर लहान दिसणारी दरवाढही गृहीणींचे बजेट बिघडविण्यास मोठा हातभार लावते.
एएनआय वृत्तसंस्थेने मदर डेअरीच्या निवेदनाच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार मदर डेअरीचे फुल क्रीम दूध महागणार आहे. उद्यापासून (मंगळवार) एक लिटर फुल क्रीम दुधाचा दर ६६ रुपये होणार आहे. सध्या त्याची किंमत 64 रुपये आहे. टोकनद्वारे मिळणारे गाईचे दूध आणि दुधाच्या दरात आज बदल करण्यात आलेला नाही. मदर डेअरीने यावर्षी (२०२२ मध्ये) पाचव्यांदा दुधाचे दर वाढवले आहेत. याआधी या कंपनीने मार्च, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दुधाचे दर वाढवले होते.
तज्ज्ञांच्या मते दुधाच्या दरात ज्याप्रकारे ‘रानटी‘ वाढ होत आहे ती आश्चर्यकारक आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भडकलेले दर कायम असतानाच गेल्या दीड वर्षात मदर डेअरी व अमूलसारख्या अग्रगण्य दूध उत्पादकांनी दुधाच्या दरात किमान १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुधाच्या दरवाढीचा परिणाम केवळ दुधाच्या दरांपुरता मर्यादित नसून त्यामुळे तूप, पनीर, खवा , दही या वस्तूंचीही महागाई पाठोपाठ येते.
१ जुलै २०२१ पूर्वी मदर डेअरीचे फुल क्रीम दूध ५४-५५ रुपये प्रति लिटर होते. उद्यापासून ते आता ६६ रुपये होणार आहे. एक लिटरच्या टोकनचे दूध ४२ रूपयांवरून ५० रूपयांवर तर टोन्ड दुधाचे दर ४७ रुपयांवरून ५१ रुपये प्रति लिटरवर आणि गायीचे दूध, ४९ वरून आता ५१ रुपये प्रति लीटर वर गेले आहे. गेल्या दीड वर्षात दूध उत्पादक कंपन्यांनी किमतीचे कारण देत दुधाच्या दरात अनेकवेळा वाढ केली आहे. दुधाच्या दरमुळे तुपाच्या दरांतही गेल्या वर्षभरात कमालीची वाढ झाली आहे. पाकिटबंद पनीर ६० रूपयांवरून ८५ ते ९० रूपयांवर गेले आहे. वर्षापूर्वी ४०० ते ४५० रुपये किलोने मिळणारे तूप आता ५५० ते ६०० किलोने मिळत आहे. आता दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे तूप आणि पनीरचेही भाव आणखी वाढणार हे निश्चित मानले जाते.