
Transgender Beauty Queen: आईने काढलं घराबाहेर, गॅंगरेप झाला… देशाच्या पहिल्या ट्रांसजेंडर ब्युटी क्वीनची कथा!
Naaz Joshi: प्रत्येक आई आपल्या मुलावर खूप प्रेम करते. भारताच्या अशाच एका आईने आपल्या मुलाची खूप काळजी घेतली, त्याला सांभाळलं, त्याचा प्रत्येक हट्ट पुरवला पण जेव्हा तो मुलगा एक ट्रांसजेंडर असं कळलं तेव्हा त्याला घराबाहेर हाकलून दिलं.
तेव्हा तो मुलगा अवघ्या १० वर्षांचा होता. या मुलामध्ये काळानुरूप बदल घडू लागले, ही कहाणी आहे देशातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर इंटरनॅशनल ब्युटी क्वीन जिंकणाऱ्या नाज जोशीची. जीने भारताचे नाव जगभर गाजवले.
आईने स्वतःपासून दूर केले
नाज जोशीने आतापर्यंत 8 सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यापैकी 7 आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहेत. जगभरात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाझचा हा प्रवास सोपा नव्हता. दिल्लीतील एका संपन्न कुटुंबात जन्मलेल्या नाझच्या कुटुंबीयांनी त्यांचा मुलगा ट्रान्सजेंडर असल्याचे कळल्यावर त्याचा तिरस्कार करायला सुरुवात केली.
मुलगा असूनही मुलीसारखे रहावं असं नाजला वाटत होतं, त्याच्यातले हे बदल बघून लोक त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर टीका करू लागले. समाजात अपमान होऊ नये म्हणून नाजला मुंबईत त्याच्या मामाकडे पाठवून दिलं.
सामूहिक बलात्काराची शिकार
मामाने १० वर्षाच्या नाजला ढाब्यावर काम करायला लावले, जेणेकरून स्वतःला काही पैसे मिळतील. पण एके दिवशी ती ढाब्यावर काम करून परतली तेव्हा तिच्या मामाचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत दारू पीत होता. मग त्याने नाजला दारू पिण्यास सांगितले, पण तिने नकार दिला.
तेव्हा नाजला कोल्डड्रिंक देऊ केलं, नाजनेही ते घेतलं पण आपल्यासोबत असे घृणास्पद कृत्य केले जाईल याची नाजला कल्पनाही नव्हती. कोल्डड्रिंक घेतल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर मामाचा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही बाब मामाला कळताच त्याने नाजला दवाखान्यात अॅडमिट केलं आणि तिकडेच सोडून दिलं.
नाइलाज म्हणून बनली सेक्स वर्कर
हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या नाजला एका ट्रांसजेंडरने पाहिले. ती नाजला ट्रांसजेंडर समाजाच्या गुरुंकडे घेऊन गेली. जिथे पैसे मिळवण्यासाठी तिला भीक मागायला पाठवायचे. बारमध्ये डान्स करायला लागला, सेक्स वर्कर म्हणूनही काम करावं लागलं. असं असूनही तिने आपले शिक्षण सोडलं नाही. इंटरमिजिएटची परीक्षा पास झाल्यानंतर ती तिच्या आयुष्याला कंटाळली होती. वयाच्या १८ व्या वर्षी ती डिप्रेशनमध्ये गेली होती.
जिद्द सोडली नाही
त्यानंतर नाजने तिच्या चुलत बहिणीशी फेसबुकच्या माध्यमातून चर्चा केली. तिने नाजला मदत केली आणि तिला फॅशन डिझायनिंग कोर्ससाठी NIFT, दिल्लीमध्ये प्रवेश मिळवून दिला. नाझ जोशीने इथे टॉप केलं आणि कॅम्पस मध्ये त्यांची प्लेसमेंट झाली. नोकरीदरम्यान कमावलेल्या पैशातून नाजने शस्त्रक्रिया करून तिचे लिंग बदलले, ती मुलगी झाली. पुढे एका प्रसिद्ध फोटोग्राफरची नजर नाजवर पडली.
त्याने तिला मॉडेल बनण्याची प्रेरणा दिली. अशा प्रकारे नाजला एका फॅशन शोमध्ये ट्रान्सजेंडर मॉडेल शोस्टॉपर बनण्याची संधी मिळाली. फॅशन आणि ब्युटीच्या जगात पाऊल ठेवल्यानंतर नाज जोशीचे आयुष्य बदलले. जिथे तिला पैशासोबतच प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळाली. तिने सलग तीन वर्षे मिस वर्ल्ड डायव्हर्सिटीचा किताब पटकावला. यानंतर ट्रान्सजेंडर इंटरनॅशनल ब्युटी क्वीन बनून ती जगभर प्रसिद्ध झाली.