
शेतकरी आंदोलन किमान यंदाच्या ऑक्टोबरपर्यंत तरी संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. राकेश टिकैत यांनी आज 'कानून वापसी नहीं, तो घर वापसी नहीं' या घोषणेवर शेतकरी ठाम असल्याचे सांगितले.
नवी दिल्ली - तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन किमान यंदाच्या ऑक्टोबरपर्यंत तरी संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज 'कानून वापसी नहीं, तो घर वापसी नहीं' या घोषणेवर शेतकरी ठाम असल्याचे सांगितले. सरकार शेतकऱ्यांपासून एका फोन कॉलच्या अंतरावर आहे, या पंतप्रधानांच्या ताज्या विधानावर टिकैत यांनी, तो नंबर कोणता ? आम्हाला द्या, लगेच फोन करतो,' असे प्रतिआव्हान दिले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पोलिसांनी वाढविलेल्या बंदोबस्ताबद्दल टिकैत म्हणाले की, ‘‘ येथे देशाचा शेतकरी आला आहे. कोणी गुन्हेगार नाही; मग हे अडथळे व सशस्त्र जवानांची तैनाती का केली आहे? टिकैत यांनी आज दुपारचे जेवणही काटेरी तारांजवळ बसून घेतले. यावेळी ते पुन्हा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.’’ दरम्यान या आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशाबरोबरच पंजाब व हरियानातील शेतकरी हजारोंच्या संख्येने रोज दाखल होत आहेत. दुसरीकडे काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय लोकदल, समाजवादी पक्ष आदी विविध पक्षांचे नेतेही टिकैत यांच्या आंदोलनस्थळी पायधूळ झाडत आहेत.