वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी कोरोना योद्ध्याचे निधन; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

 स्वत:चा जीव धोक्यात घालून हे कोरोनायोद्धे नागरिकांचा जीव वाचवत आहेत. आतापर्यंत अनेक कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लागण झाली असून अनेकांनी प्राणही गमावले आहेत. 

भोपाळ - कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर आरोग्य कर्मचारी लढत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून हे कोरोनायोद्धे नागरिकांचा जीव वाचवत आहेत. आतापर्यंत अनेक कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लागण झाली असून अनेकांनी प्राणही गमावले आहेत. मध्य प्रदेशात अवघ्या 26 व्या वर्षी मेडिकल ऑफिसर असलेल्या डॉक्टरचे निधन झालं आहे. 

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असताना डॉक्टर शुभम कुमार उपाध्याय यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शुभम यांची तब्येत बिघडत गेली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर भोपाळमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. चांगल्या उपचारासाठी त्यांना चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्याची तयारीसुद्धा राज्यसरकारने केली होती. डॉक्टर शुभम उपाध्याय यांच्या निधनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. 

मुख्यमंत्री शिवराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, मनाला खूप दु:ख झालं आहे. आमचा कोरोना योद्धा डॉक्टर शुभम कुमार उपाध्याय दिवस रात्र एक करून कोरोना रुग्णांची सेवा करत असताना कोरोनाबाधित झाला होता. आज त्याची प्राणज्योत मालवली. समाजसेवेचं अद्भुत असं उदाहरण शुभमने दिलं. त्याने प्राणांची आहुती दिल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

सागर इथल्या बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर शुभम उपाध्याय कोरोना बाधितांवर उपचार करत होते. त्यावेळीच काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर शुभम यांची तब्येत खालावत गेल्याने भोपाळमधील चिरायु रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. उलट हळू हळू संसर्ग वाढतच चालला होता. यादरम्यान, मध्य प्रदेश सरकारने त्यांना उपचारासाठी चेन्नईला पाठवण्याची तयारीसुद्धा केली होती. मात्र त्याआधीच शुभम यांची वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.

हे वाचा - Corona Updates: देशात कोरोनाचा प्रसार वाढला; दिल्लीत कहर

शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, शुभम आणि त्याच्या कुटुंबासोबत आम्ही आहोत. डॉक्टर शुभमच्या चेन्नईतील उपचाराची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनायोद्ध्यांना सर्वतोपरी मदतीसाठी सरकार कटीबद्ध आहे. याशिवाय कोरोनायोद्धा डॉक्टर शुभम उपाध्याय लवकरच बरे व्हावेत यासाठी प्रार्थनासुद्धा करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp 26 year doctor shubhas dies due to corona