आरोपी खासदार-आमदारांची यादी सादर : खासदारांविरुद्ध सीबीआयकडे ३७ गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court

आरोपी खासदार-आमदारांची यादी सादर : खासदारांविरुद्ध सीबीआयकडे ३७ गुन्हे

नवी दिल्ली : देशातील ५१ आजी-माजी खासदार आणि ७१ आमदारांना सक्तवसुली संचालनालयाने(इडी) विविध प्रकरणांमध्ये आरोपी केले आहे. आजी माजी खासदार आणि आमदारांविरुद्ध सीबीआयने नोंदविलेले १२१ खटले प्रलंबित आहेत. अमॅकस क्युरी म्हणजेच न्यायालयीन मित्राच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला आज ही माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची उद्या (ता. १६) सुनावणी होणार आहे.

अश्विनीकुमार उपाध्याय विरुद्ध भारत संघराज्य या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या संदर्भात प्रलंबित प्रकरणांच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी ईडी आणि ‘सीबीआय’ने एक देखरेख समिती स्थापन करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. ‘ईडी‘ च्या वतीने अमॅकस क्युरी म्हणून काम पहाणारे ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या वस्तुस्थितीदर्शक अहवालात नमूद केले आहे की ५१ आजी-माजी खासदारांना इडीने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीएमएलए) आरोपी म्हणून निश्चित केले आहे.

खासदारांविरुद्ध सीबीआयकडे ३७ गुन्हे

ईडीचे आरोपी असलेल्या या ५१ खासदारांपैकी १४ विद्यमान, ३७ माजी आणि ५ खासदार मृत्यू पावलेले आहेत. जे आमदार सीबीआयच्या प्रकरणांमध्ये अडकले आहेत, त्यापैकी ३४ विद्यमान व ७८ माजी आमदार आहेत. ९ जणांचा मृत्यू झाला आहे. खासदारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या ‘सीबीआय’च्या प्रकरणांची संख्या ३७ आहे.

टॅग्स :CBIMLAEDAccused