चर्चा तर होणारच! साताऱ्यात विरोधात लढले मात्र दिल्लीत एकत्र भेटले

टीम ई सकाळ
Friday, 5 February 2021

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला होता. आता दिल्लीतील दोघांच्या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी दिल्लीत भेट घेतली. या भेटीचा फोटो खासदार उदयनराजे भोसले यांनी शेअर केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला होता. आता दिल्लीतील दोघांच्या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

विधानसभा निवडणुकीवेळी उदयनराजेंनी राष्ट्रवादीला राम राम करून भाजप प्रवेश केला होता. त्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले होते. ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्यानंतरही श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्याचं मैदान मारलं होतं. यावेळी साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भरपावसातली सभा झाली होती. या सभेनं फक्त साताऱ्याचाच नाही तर राज्यातील निवडणुकीचा निकाल बदलला होता. 

पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाल्यानंतर त्यांना भाजपने राज्यसभेवर निवडून दिलं. साताऱ्यात सध्या भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक असे तीन खासदार आहेत. यामध्ये माढ्यातून रणजितसिंह नाइक निंबाळकर हे भाजप खासदार आहेत. हे तिघेही अर्थसंकल्पिय अधिवेशनानिमित्त दिल्लीमध्ये आहेत. यावेळी उदयनराजे आणि श्रीनिवास पाटील यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भेट झाली. 

हे वाचा - आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे ताबडतोब मागे घ्या; साताऱ्याच्या खासदारांची मोदी सरकारकडे मागणी

खासदार उदयनराजे यांनी श्रीनिवास पाटील यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. उदयनराजेंनी म्हटलं की, दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट झाली. या भेटीत सातारा जिल्ह्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामूहिकरित्या संसदेत मांडण्याबाबत चर्चा झाली असंही ते म्हणाले. दरम्यान, दोघांच्या या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp udayanraje meet mp shrinivas patil in delhi