एमएसपी दराने आठ राज्यात ८५ लाख टन तांदळाची खरेदी 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 20 October 2020

पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, तमिळनाडू, उत्तराखंड, चंडीगड, केरळ ही राज्ये आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातून ७.३८ लाख शेतकऱ्यांकडून ८४.४६ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त तांदळाची खरेदी झाली.

नवी दिल्ली - कृषी सुधारणा कायद्यांविरुद्ध राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांची आंदोलने सुरू असली तरी आधारभूत दराने (एमएसपी) खरीप पिकांच्या खरेदीने वेग घेतला असून आंदोलनांची तीव्रता असलेल्या पंजाब, हरियानासह आठ राज्यांमधून सुमारे ८५ लाख टन तांदळाची खरेदी आतापर्यंत झाली आहे. तर महाराष्ट्रातून कडधान्य, तेलबिया खरेदी केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामातील तांदळाची खरेदी सुरळीतपणे सुरू असून शनिवारपर्यंत, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, तमिळनाडू, उत्तराखंड, चंडीगड, केरळ ही राज्ये आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातून ७.३८ लाख शेतकऱ्यांकडून ८४.४६ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त तांदळाची खरेदी झाली. यासोबतच विविध राज्यांतून आलेल्या खरेदीच्या प्रस्तावानुसार तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण, गुजरात, हरियाना, उत्तरप्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांतून ४१.६७ लाख टन कडधान्य व तेलबिया खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. तर आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून १.२३ टन खोबरे खरेदीलाही केंद्राने होकार दर्शविला आहे. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाकडून मूल्याधार योजनेअंतर्गत डाळी, तेलबिया आणि खोबऱ्याच्या खरेदीचे प्रस्ताव आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल. तसेच या पिकांच्या किमती किमान आधारभूत दरापेक्षा (एमएसपीपेक्षा) खाली आल्यास राज्यांनी निर्धारित केलेल्या संस्थांमार्फत केंद्रीय नोडल संस्था नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करतील. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

१६,५३६९ गाठी कापूस खरेदी 
केंद्राने शनिवारपर्यंत ५.२१ कोटी रुपये खर्च करून ७२३.७९ मेट्रिक टन मूग आणि उडदाची खरेदी केली, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाना येथील ६८१ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. तसेच कर्नाटक आणि तमिळनाडूमधून ५०८९ मेट्रिक टन खोबऱ्याचीही खरेदी झाली. कापूस खरेदी हंगाम १ ऑक्टोबर २०२० पासून सुरु झाला असून कापूस महासंघाने १७ ऑक्टोबरपर्यंत एमएसपी दराने ४६६९७.८६ लाख रुपयांचा एकूण १६५३६९ गाठी कापूस खरेदी केला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSP rate buy 85 million tons of rice in eight states