Mucormycosis : कोविड- १९ आणि ब्लॅक फंगस, लक्षणे आणि उपचार जाणून घ्या

mucormycosis
mucormycosisfile photo

राहुरी (अहमदनगर) ः सध्या कोरोना आणि त्यामुळे जाणाऱ्या बळींचीच जगभर चर्चा आहे. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राची वाताहत झाली आहे. कोरोनासोबत आलेल्या म्युकरमायकोसिसने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्याने अनेकांचे बळी जात आहेत. नेमकी त्याची लक्षणे काय आहेत, त्यापासून कसा बचाव करू शकतो, दुसऱ्या लाटेत ज्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांना नेमका त्याचा काय धोका आहे. तसेच कोविड-१९ काय आहे, त्यापासून कसा बचाव करू शकतो, या विषयी कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. नीलिमा प्रवीण घाडगे यांची मते जाणून घेतली. त्या (मूळ रा. कणगर ता. राहुरी, जि. अहमदनगर) लंडन येथील क्वीन्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.(Mucormycosis: Covid-19 and Black Fungus, know the symptoms and treatment)

काय आहे ब्लॅक फंगस?

ब्लॅक फंगसचे शास्त्रीय नाव म्युकर मायकोसिस असे आहे. हे फंगस (बुरशी) माती, पाला-पाचोळा व प्राण्यांच्या शेणामध्ये सापडते. त्याचे बीज हवेतून वातावरणात पसरतात. श्वासातून ते नाकात जातात. तेथे ते मोठ्या प्रमाणात गाळले जातात. निरोगी माणसासाठी ते घातक नसतात. कारण निरोगी शरीरातील मजबूत प्रतिकारशक्ती त्याला शरीरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करते.

इन्फेक्शन कधी होते?

साधारणतः मधुमेह नियंत्रित नसणाऱ्या रुग्णांमध्ये जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तेव्हा म्युकरमायकोसिसचे इन्फेक्शन होते. त्याचे प्रमाण तसे खूप कमी आहे.

mucormycosis
शोकांतिका! कुटुंबातील तिघांना कोरोनाने नेले, घर चोरांनी लुटले!

इन्फेक्शनमध्ये नेमके काय होते?

रक्तातील साखर वाढलेली असताना आणि 'न्यूट्रोफिल' या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी कमी (न्युट्रोपेनिया) झाल्यानंतर या बुरशीचे इन्फेक्शन होते. मुख्यतः नाक आणि नाकाजवळच्या हवेच्या पोकळ्या (सायनस)मध्ये ही बुरशी पसरते. मग जवळच्या रक्तवाहिन्यांमधून मेंदूपर्यंत जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे ही बुरशी रक्तवाहिनी किंवा नसांमध्ये घुसून अवतीभोवती वाढते. लाकडाला लागणाऱ्या वाळवीसारखे आजूबाजूच्या हाडांना पोखरते. हाडांचा भुगा करून यामार्गे सुद्धा मेंदूपर्यंत पसरते. ही बुरशी डोळ्याला व मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्यामधून होणारा रक्तपुरवठा अडवते. मग रक्ताच्या गुठळ्या होऊन दृष्टी जाणे किंवा मेंदूमध्ये रक्तपुरवठा कमी होऊन अर्धांगवायू होणे असे भयंकर प्रकार संभवतात.

इन्फेक्शन झाल्याची लक्षणे काय?

वाळवीपेक्षा ही बुरशी खूप झपाट्याने वाढते. बऱ्याचदा काही लक्षणे दिसण्यापूर्वीच ती मेंदूपर्यंत पोहोचते. या इन्फेक्शनमध्ये दिसणारी काही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. नाक बंद झाल्यासारखे वाटणे. नाकामधून रक्तमिश्रित पाणी येणे. चेहऱ्यावरती सूज येणे. चेहऱ्यावर दुखणे किंवा डोळा सुजणे. एक प्रकारचा बधीरपणा नाकाच्या आजूबाजूच्या त्वचेवर जाणवतो. दृष्टीवरही त्याच परिणाम जाणवतो. डोळ्यांची हालचाल कमी जाणवणे किंवा हालचाल करताना दुखणे. डोकेदुखी होणे. ताप येणे इत्यादी.

कोविड-१९च्या पेशंटमध्ये या बुरशीचे प्रमाण जास्त का असते?

कोविडचा संसर्ग झालेल्या पेशंटमध्ये मधुमेहाव्यतिरिक्त या बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रुग्णाची कमी होणारी प्रतिकारशक्ती हेच होय. ही प्रतिकारशक्ती कमी होण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.

कोविड-१९ संसर्ग, विनाकारण किंवा जास्त प्रमाणात दिलेले स्टेरॉइड व टोसिलिझुमाब नावाचे औषध. ही औषधे घेऊन कोविड -१९ मधून बरे होऊन घरी गेल्यानंतर रुग्णाची रक्तातली साखर मोजली जात नाही. तसेच त्याच्या पांढऱ्या रक्तपेशी कमी आहेत की जास्त आहेत. हेही कळत नाही. सुरुवातीला काही लक्षणे दिसत नसल्यामुळे कोविड-१९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस बळावेपर्यंत लक्षात येत नाही.

mucormycosis
अजितदादांना लागली नीलेश लंकेंच्या आरोग्याची काळजी

या बुरशीवर काय उपचार आहे?

जितक्या लवकर याचं निदान होऊ शकेल. तितक्या लवकर रुग्णावर योग्य ते उपचार केले जाऊ शकतात. मुळात 'प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर' हे या बुरशीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. या बुरशीवर उपचार करण्यासाठी काही इंजेक्शन आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 'अंफोटेरिसिन-बी'चा उल्लेख होतो. परंतु ही बुरशी जर पसरली असेल तर शस्त्रक्रिया करून खराब झालेला डोळ्याभोवतीचा भाग काढण्याशिवाय काहीच पर्याय राहत नाही. यामध्ये डोळा किंवा सायनसचा काही भाग काढणे क्रमप्राप्त होते. याचे कारण म्हणजे या बुरशीमुळे सूक्ष्म रक्तवाहिन्या बंद पडल्यामुळे दिलेले इंजेक्शन बुरशीपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे बुरशी आणखी वाढतच राहते. म्हणून बुरशी किती वाढली आहे. हे बघण्यासाठी एमआरआय करून शस्त्रक्रिया केली जाते.

मग खराब झालेला भाग काढून टाकल्यानंतर ही बुरशी पुन्हा वाढू नये म्हणून त्यावर लागू पडणारे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन देणेही सोपे नसते. ते नळीवाटे हृदयात डायरेक्ट जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये सोडावे लागते. हे इंजेक्शन किडनीवर परिणाम करत असल्यामुळे नियमितपणे किडनी फंक्शन बघावे लागते. त्यामुळे हे रुग्ण अतिदक्षता विभागात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली दाखल करावे लागतात.

या बुरशीपासून स्वतःला कसे वाचवता येईल?

तुमची कोरोनासाठीची चाचणी पॉझिटिव्ह आली. तरी घाबरून जाऊ नका. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर नियमितपणे रक्तातील साखर मोजा. ऑक्सिजनची पातळी नियमितपणे बघा. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार घ्या. आजाराच्या सुरुवातीच्या काळात स्टेरॉइड घेणे चुकीचे आणि खूप धोकादायक असते. उपचार सुरू करताना तुमच्या डॉक्टरांशी याबाबत चर्चा करा.

तुम्ही कोविड-१९ मधून बरे झाला असाल किंवा खूप दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर घरी आला असाल. तर वरील लक्षणांकडे बारकाईने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. त्याबरोबरच तुमची शुगर आणि पांढऱ्या रक्तपेशीची संख्या बघण्यासाठी हिमोग्राम केलेला फायद्याचे ठरेल. आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणे कधीही चांगलेच. वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्हाला त्वरित उपचार देणाऱ्या डॉक्टरांना किंवा नजीकच्या कान, नाक, घसा तज्ज्ञांना संपर्क करणे उचित ठरेल.

हे लक्षात ठेवा:

१. म्युकरमायकॉसीस या बुरशीचा इलाज करणे अतिशय कठीण आहे. लवकर निदान झाल्यास योग्य तज्ज्ञांचा सल्ला आणि उचित औषधोपचार करून घेणे महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा नुसत्या औषधोपचारांचा उपयोग होत नाही, तर बुरशी झालेला भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो. वेळीच गांभीर्याने घेतले नाही, तर मेंदूपर्यंत ती बुरशी पसरून जीवाला धोका होऊ शकतो.

२. म्युकर मायकॉसीस हा कोविड-१९ यापूर्वी दुर्मिळ असल्याने, त्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया किचकट असल्याने, त्यासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे आणि परिपूर्ण शस्त्रक्रिया करू शकणारे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. तसेच शस्त्रक्रियेसाठी आणि नंतरही वेगवेगळ्या विषयात तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांची आवश्यकता असते. शस्त्रक्रिया अपूर्ण झाल्यास बुरशी पुन्हा पसरते. या सर्व गोष्टींचा विचार करून वेळेत योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

३. स्वतःहून स्टेरॉइड्स घेणे टाळा. स्टेरॉइडचा उपयोग हा कोरोना या विषाणूचा उपचार करण्यासाठी नव्हे, तर सायटोकाईन स्टॉर्म कंट्रोल करण्यासाठी अतिदक्षता विभागात भरती असणाऱ्या रुग्णांमध्ये करणे अपेक्षित आहे. त्यामुळे अवेळी आणि अयोग्य प्रकारे शरीरामध्ये गेलेले स्टेरॉइड अतिशय घातक ठरू शकते. टोसिलिझुमाब हेसुद्धा विनाकारण दिले गेले तर दुष्परिणाम उद्भवू शकतात.

४. म्युकर मायकॉसिस नावाची ही नव्याने येऊ घातलेली महामारी मानवनिर्मित आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण या दोघांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. अन्यथा कोविड-१९ ची पुढची लाट येण्यापूर्वीच दुसऱ्या लाटेतून वाचलेल्या रुग्णांचा नाहक बळी जाईल.

(Mucormycosis: Covid-19 and Black Fungus, know the symptoms and treatment)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com