2021 मध्ये Jio करणार 5G नेटवर्क लाँच; मुकेश अंबानींची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

जिओ अगदी स्वस्त दरामध्ये भारतात 5G ची सुरवात करणार आहे.

नवी दिल्ली : इंडियन मोबाईल काँग्रेस 2020 ( Indian Mobile Congress 2020) ची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मंगळवारी उद्घाटन होऊन सुरवात झाली. या काँग्रेसच्या पहिल्याच दिवशी देशातील मोठी मोबाईल कंपनी रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी घोषणा केलीय की भारतामध्ये 5G नेटवर्कचे नेतृत्व जिओच करेल. 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत या 5G नेटवर्कला लाँच करण्याची सर्व तयारी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. जिओ अगदी किफायती दरामध्ये भारतात 5G ची सुरवात करणार आहे.

30 कोटी लोक अद्यापही वापरतात 2G नेटवर्क
अंबानी यांनी म्हटलं की 30 कोटी भारतीय डिजीटल वर्ल्डमध्ये आज देखील 2G नेटवर्कचा वापर करत आहेत. मुकेश अंबानी यांनी सरकारला आग्रह केला आहे की, त्यांनी या दिशेने पाऊल उचलावं. जेणेकरुन 30 कोटी लोक भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेशी स्वत:ला जोडून घेऊन याचा फायदा घेऊ शकतील. त्यांनी 2G पासून 30 कोटी भारतीयांना मुक्त करण्याचा तसेच त्यांना स्मार्टफोनवर शिफ्ट करण्यासाठी सरकारद्वारे पॉलिसी बनवण्याचा आग्रह केला. 

हेही वाचा - तुम्हाला बोलवूनच चूक केली, शरद पवार पत्रकारांवर भडकले​
जिओची 5G ची टेकनिक आहे संपूर्ण स्वदेशी
मुकेश अंबानी यांनी पुढच्या वर्षी म्हणजे 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत स्वदेशी 5G टेक्नोलॉजी लाँच करण्याची तयारी असल्याचे संकेतही दिले आहेत. त्यांनी रिलायन्स जिओची 5G टेकनिक ही संपूर्ण स्वदेशी असल्याचं सांगितलं. मुकेश अंबानी यांनी म्हटलं की, जिओची स्वदेशी 5G टेकनिक पंतप्रधान मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत मिशन'च्या यशस्वितेचा पुरावा आहे.

चौथ्यांदा IMC चे भारतात आयोजन
भारतात इंडियन मोबाईल काँग्रेसचे चौथ्यांदा आयोजन झालं आहे. दरवर्षी बार्सिलोनामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेसचे आयोजन केलं जातं. याच धरतीवर भारतामध्ये IMC चे आयोजन होतं. यामध्ये देशातील तसेच विदेशातील अनेक मोठ्या टेक्नोलॉजी आणि आयटी कंपन्या भाग घेतात. तसेच आपले प्रोडक्ट लाँच करतात. आज 8 डिसेंबर रोजी सुरु झालेला हा कार्यक्रम आता 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहिल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukesh ambani said reliance Jio to launch 5g in india in med 2021