11 वर्षांपासून वाढले नाही मुकेश अंबानींचे वेतन!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 जुलै 2019

अंबानी यांच्या वेतनात वाढ झालेली नसली, तरी या काळात त्यांच्या एकूण उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे.

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या वेतनात गेल्या 11 वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या आर्थिक वर्षात (2018-19) त्यांना वेतनापोटी पूर्वीइतकेच म्हणजे 15 कोटी रुपये मिळाले असून, कंपनीच्या इतर संचालकांच्या वेतनात मात्र घसघशीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. 

कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, मुकेश अंबानी यांना गेल्या आर्थिक वर्षात 4.45 कोटी वेतन व भत्ता, 9.53 कोटी कमिशन, 27 लाख अन्य सुविधा, तसेच 71 लाख रुपये सेवानिवृत्ती लाभ अशा स्वरूपात 15 कोटींपेक्षा कमी वेतन मिळाले आहे. सीईओ व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणारे वेतन मर्यादित असावे, या विचारातून मुकेश अंबानी यांनी स्वतःहून आपली वेतन सीमा ठरवून घेतल्याचे सांगितले जाते. 

दरम्यान, अंबानी यांच्या वेतनात वाढ झालेली नसली, तरी या काळात त्यांच्या एकूण उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे. समूहाची 48 टक्के मालकी असलेल्या अंबानींना हजारो कोटी केवळ लाभांश स्वरूपात मिळाले असून, त्या तुलनेत मिळणारे वेतन अगदी नगण्य आहे. 

अन्य संचालकांचे वेतन (आकडे कोटी रुपयांत)
- निखिल मेस्वानी : 20.57 
- हितल मेस्वानी : 20.57 
- पी.एम.एस. प्रसाद : 10.01 
- पवन कुमार कपिल : 4.17 

अंबानी दांपत्याकडील शेअर व त्यांचे मूल्य 
मुकेश अंबानी : 72.31 लाख (903 कोटी) 
नीता अंबानी : 67.96 लाख (849 कोटी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambanis salary has not increased from 11 years