Year Ender 2022 : मुलायमसिंग यादव ते विनायक मेटे; या 5 नेत्यांनी सरत्या वर्षात सोडली साथ

Year Ender 2022
Year Ender 2022esakal

मुंबईः 2022 हे वर्ष अनेक मुद्द्यांनी गाजलं. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर मोकळा श्वास घ्यायला मिळाला. उद्योगाची चाकं फिरु लागल्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. गुन्हेगारीच्या काही घटनांनी तर देशाला हादरवून सोडलं. यातच काही दिग्गज माणसं या वर्षात आपल्याला कायमची सोडून गेली. ज्यांनी राजकारण, समाजकारण, कला, उद्योग या क्षेत्रामध्ये संघर्ष करुन अस्तित्व निर्माण केलं; त्यांनी याच वर्षात या जगाचा निरोप घेतला.

1. मुलायमसिंग यादव

देशातील एक महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांचं १० ऑक्टोबर २०२२ रोजी निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. रक्तदाबाच्या समस्येमुळे त्यांना २२ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुलायम सिंग यादव हे समाजवादी पक्षाचे संस्थापक होते. ४ ऑक्टोबर १९९२ रोजी त्यांनी पक्ष स्थापन केला. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही राहिले होते. त्यांना नेताजी या नावानं ओळखलं जात होतं.

१९६७ साली त्यांनी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांचा निवडणूक लढवली. त्यानंतर तब्बल १८ वेळा ते विधानसभेत निवडून गेले. तब्बल तीनवेळा त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. २०१९ मध्ये मुलायम सिंग यांनी मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत लोकसभेत पाऊल ठेवलं. त्यांच्या जाण्याने एक दुरदृष्टी नेतृत्व हरपल्याच्या भावना व्यक्त झाल्या.

ND Patil
ND Patilesakal

2. एन. डी. पाटील

ज्येष्ठ विचारवंत आणि शेकाप नेते एन.डी. पाटील सरत्या वर्षाच्या सुरुवातीला अखेरचा श्वास घेतला. १७ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी कोल्हापुरात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. एन.डी. पाटलांचं पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील होतं. सांगलीतल्या ढवळी येथील शेतकरी कुटुंबात १५ जुलै १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला होता.

एनडी पाटील हे उच्चशिक्षित होते. एमए, एलएलबी झालेल्या पाटलांनी काही वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केलं. १९४८ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम केलं. १८ वर्षे ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. विशेष म्हणजे १९७८ ते ८० या कालावधीत त्यांनी राज्याचे सहकारमंत्री म्हणून काम केलं.

Vinayak Mete
Vinayak MeteEsakal

3. विनायक मेटे

मराठा समाजाचा लढवय्या नेता म्हणून विनायक मेटे यांची ओळख होती. मराठा आरक्षणासाठी त्यांनी राज्यभर मोर्चे, आंदोलनं आणि यात्रा काढून रान पेटवलं होतं. स्व. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर आरक्षणाचा लढा स्व. विनायक मेटे यांनी जिवंत ठेवला. मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी लढा उभारला. त्यानंतर त्यांनी स्वतःची शिवसंग्राम ही संघटना स्थापन केली.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकीसाठी जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. १४ ऑगस्ट २०२२ रोजी बीडहून मुंबईकडे जात असतांना पुणे-मुंबई महामार्गारील खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. चालकाची चूक असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. २७ वर्षांच्या राजकीय आयुष्यात मेटेंनी २५ वर्षे विधान परिषदेची आमदारकी निभावली. नुकताच त्यांचा कार्यकाळ संपला आणि त्यांचं अपघाती निधन झालं.

Mukta Tilak
Mukta Tilakesakal

4. मुक्ता टिळक

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजप आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं नुकतंच निधन झालं. सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात २२ डिसेंबर २०२२ रोजी मुक्ता टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक महिन्यांपासून मुक्ता टिळक मृत्यूशी झुंज देत होत्या. मृत्यूसमयी त्यांचं वय ५७ वर्षे होतं.

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून मुक्ता टिळक यांची ओळख होती. कर्करोगाशी लढा देत असतांनाही त्यांनी व्हिलचेअरवर बसून मुंबईत राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी मतदानाचा हक्क बजावला होता. २०१९ मध्ये कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून गेल्या. २०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या. कर्तव्यनिष्ठ अशी ओळख असलेल्या मुक्ता टिळक यांच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

5. जयंती पटनायक

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयंती पटनायक यांचं २८ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झालं. जयंती पटनायक ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष आणि माजी खासदार होत्या. ओडिशाचे दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. बी. पटनायक यांच्या त्या पत्नी होत्या.

जयंती पटनायक केवळ राजकीय नेत्या नव्हत्या तर त्या साहित्यिक, अनुवादक होत्या. ओडिशाच्या राजकारणामध्ये नंदनी शतपथी यांच्यानंतर सर्वात प्रभावशाली नेत्या म्हणून जयंती पटनायक यांचं नाव घेतलं जातं. त्यांचा जन्म ७ एप्रिल १९३२ मधअये गंजाम जिल्ह्यातल्या आशिकामध्ये झाला होता. १९९८ मध्ये बरहमपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. १९९२ ते १९९५ या काळात त्या देशाच्या महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com