अटकेपार तिरंगा फडकवणारी मुंबईची 'फ्लाईंग गर्ल'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 August 2019

मुंबईची २३ वर्षीय सिटी पायलट आरोही पंडित अटलांटिक व पॅसिफिक हे दोन महासागर पार करणारी पहिली महिला ठरली आहे. मे महिन्यात आरोहीने अटलांटिक महासागर पार करण्याचा इतिहास रचला होता. तर आता पुन्हा एकदा आरोहीने एकटीने भरारी घेत पॅसिफिक महासागर पार करण्याची किमया केली आहे. 

नवी दिल्ली : महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. मुंबईच्या २३ वर्षीय सिटी पायलट आरोही पंडितने आपल्या कामगिरीने महिलांना मान उंच करुन चालण्यासाठी एक अजून संधी दिली आहे. आरोही अटलांटिक व पॅसिफिक हे दोन महासागर पार करणारी पहिली महिला ठरली आहे. मे महिन्यात आरोहीने अटलांटिक महासागर पार करण्याचा इतिहास रचला होता. तर आता आरोहीने पुन्हा एकदा एकटीने भरारी घेत पॅसिफिक महासागर पार करण्याची किमया केली आहे. 

आरोहीने आपल्या माही या लहान एअरक्राफ्टने अलास्का पर्वतावरून एकटीने उड्डाण भरत, प्रशांत महासागरावरून पुढे बेरिंग समुद्र पार करत रशियात उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर एअरक्राफ्टमधून खाली उतरल्यावर तिने सर्वप्रथम हातात देशाचा तिरंगा घेत आपल्या यशाचा आनंद साजरा केला. दोन महिन्यांपुरवी आरोहीने अटलांटिक महासागरावरून भरारी घेत एका लहान एअरक्राफ्टने ३ हजार किलोमीटर अंतर पार केले होते. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी दोन्ही महासागर पार करण्याची लक्षवेधी कामगिरी पुर्ण केली आहे.

आरोहीने यासाठी सात महिन्यांचे प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणादरम्यान आरोहीने अनेक आव्हानात्मक परिस्थितींचा सामना केला. याच मोहिमेच्या प्रशिक्षणाच्या मेहनतीतून आरोही पंडितने एकटीने उड्डाण भरत दोन्ही समुद्र पार करत भारताचा झेंडा फडकावला आहे.

अनेक विक्रमांना गवसणी

आरोहीने या प्रदक्षिणेदरम्यान अनेक विक्रमांना गवसणी घातली. ती ग्रीनलँड आइसकॅपवरून उड्डाण करणारी पहिली महिला, तर उत्तर-पूर्वेकडून दक्षिण-पश्चिमेकडे असा संपूर्ण कॅनडा ओलांडणारी पहिली महिला ठरली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai's 'Flying Girl Tricolor Flaunt on pacific ocean