esakal | 'आम्ही लवकरच तुला घेऊन जाऊ'; कोविडग्रस्त आईला मुलांचं भावनिक पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

'आम्ही लवकरच तुला घेऊन जाऊ'; कोविडग्रस्त आईला मुलांचं पत्र

'आम्ही लवकरच तुला घेऊन जाऊ'; कोविडग्रस्त आईला मुलांचं पत्र

sakal_logo
By
शर्वरी जोशी

वर्षभरापूर्वी देशात कोरोना (covid) विषाणूने शिरकाव केला आणि पाहता पाहता या विषाणूची दुसरी लाटही येऊन ठेपली. या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जास्त असून आतापर्यंत अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढ असल्यामुळे कोविड सेंटरमध्येही आता बेड आणि ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे बऱ्याचदा बेड किंवा ऑक्सिजन सिलेंडर अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याच्याही घटना कानावर येत आहेत. म्हणूनच, रुग्णांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबियांनादेखील आपल्या आप्तजनांची तितकीच काळजी वाटत आहे. यामध्येच सध्या प्रत्येक जण हवालदिल होत असून सोशल मीडियावर एक पत्र वाऱ्यासारखं व्हायरल होत आहे. कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका आईला (mother) तिच्या मुलांनी हे पत्र (letter) लिहिलं आहे. (mummy-family-members-gave-emotional-letter-to-covid-patient-mother-goes-viral)

सोशल मीडियावर चर्चेत येत असलेलं पत्र काही मुलांनी त्यांच्या आईला लिहिलं आहे. या मुलांच्या आईवर सध्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असून बाहेरील परिस्थिती पाहून त्या घाबरल्या आहेत. या काळात त्यांच्या जवळ कोणत्याही व्यक्तीला जाण्याची परवानगी नसल्यामुळे आईचं मनोबल वाढवण्यासाठी मुलांनी पत्राच्या माध्यमातून तिच्याशी संवाद साधला आहे.

हेही वाचा: Fact Check : कोविड व्हॅक्सिन घेतल्यावर दोन वर्षात होतो मृत्यू?

"आई, आम्ही सगळे खालतीच आहोत. तुझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे. आम्ही लवकरच तुला इथून घेऊन जाऊ. काळजी करु नकोस", असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सोबतच मुनमुन, बुलबुल, गुडियाँ आणि विकास या चार मुलांची नावंही लिहिण्यात आली आहेत.

दरम्यान, या चारही मुलांनी त्यांच्या आईसाठी लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चिलं जात आहे.अनेकांनी या मुलांचं कौतुक केलं आहे. एकीकडे काही मुलं आपलं आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. तर, इथे मात्र, मुलं आपल्या आईला घरी घेऊन जाण्यासाठी वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अनेक जण कौतुकाचा वर्षाव करत आहेत.