
Crime News : वकिलाच्या वेशात लखनौ न्यायालय परिसरात गुंडाचा खून
लखनौ : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा सहकारी आणि एकेकाळी शूटर राहिलेला कुख्यात गुंड संजीव जीवा माहेश्वरी याचा आज गोळी झाडून खून करण्यात आला. हा प्रकार लखनौतील न्यायालयाच्या आवारात घडला.
या गोळीबारात एक कॉन्स्टेबल व अडीच वर्षाची मुलगी जखमी झाली. हल्लेखोर वकिलाच्या वेशात आला होता. दरम्यान, या हल्ल्याच्या चौकशीसाठंी योगी आदित्यनाथ सरकारने तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना केली.
गुंड संजीव जीवा माहेश्वरी याच्यावर अनेक खटले सुरू असल्याने त्याला आज सुनावणीसाठी लखनौतील कैसरबाग येथे पोक्सो न्यायालयात आणण्यात आले. त्यावेळी वकिलाचा गणवेश घालून दबा धरलेल्या हल्लेखोरांनी संजीव जीवा याच्यावर गोळीबार केला. यानंतर हल्लेखोर पळून गेले. यात जीवा माहेश्वरीचा जागीच मृत्यू झाला.
तसेच या गोळीबारात अडीच वर्षाची मुलगी आणि कॉन्स्टेबल जखमी झाले. दरम्यान, गोळीबारानंतर वकिलांनी न्यायालयाच्या आवारात आंदोलन केले. लखनौ पोलिस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. न्यायालयाच्या आवारात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा त्यांनी आरोप केला. अशा घटनांना जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना पोलिसांकडून संरक्षण आणि आश्रय दिले जात असल्याचा आरोप वकिलांनी केला.
कंम्पाउंडर ते कुख्यात गुंड
संजीव जीवा माहेश्वरी हा मुझफ्फरनगर येथील रहिवासी. त्याचे मुख्तार अन्सारीशी थेट संबंध होते. तो मुख्तारचा शूटर राहिलेला आहे. त्याचे नाव बहुचर्चित कृष्णानंद राय हत्याकांडातून समोर आले. संजीव सध्या लखनौच्या तुरुंगात होता.
१९९० च्या दशकात संजीव जीवा माहेश्वरीने दहशत निर्माण केली होती. सुरवातीला तो एका दवाखान्यात कंम्पाउंडर म्हणून काम करत होता. नोकरी करत असतानाच त्याने दवाखान्याच्या संचालकाचे अपहरण केले. या घटनेनंतर त्याने १९९० च्या दशकात कोलकता येथील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण केले. यासाठी त्याने दोन कोटींची खंडणी मागितली होती.