
Purnahuti Music Program : दिल्लीकरांना आजपासून स्वरांची मेजवानी !
नवी दिल्ली - राजकीय राजधानी दिल्लीतील संगीत रसिकांसाठी उद्यापासून (ता.२४) दोन दिवस अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळणार आहे. निमित्त आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि संगीताचार्य पं. डी. व्ही. काणेबुवा प्रतिष्ठान यांच्या वतीने दिल्लीत होणारा "पूर्णाहुती" हा संगीतमय कार्यक्रम. या गायनोत्सवात पं. उल्हास कळाळकर, आरती अंकलीकर, संजीव अभ्यंकर, राकेश चौरसिया आदी दिग्गजांचे गायन वादन एकण्याची पर्वणी यानिमित्ताने दिल्लीकर रसिकांना मिळणार आहे.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सदनात होणारा हा संगीतमय कार्यक्रम विनामूल्य असेल असे पं. काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर आणि सचिव तसेच प्रसिध्द गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी सकाळ ला सांगितले. पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त काणेबुवा प्रतिष्ठानने मुंबई, पुणे, बंगळूर येथे संगीत महोत्सव आयोजित केले होते.
त्या मालिकेतील दिल्लीचा अखेरचा कार्यक्रम असल्याने ही पूर्णाहुती असेल असेही पाटील यानी सांगितले. दिल्लीतील हा ‘पूर्णाहुती‘ कार्यक्रम तीन सत्रांमध्ये होणार आहे. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेआठ, २५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० व सायंकाळी ५.३० अशा दोन सत्रांत हा गायनोत्सव आयोजित केला जाणार आहे.
या सोहळ्यात पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, पं. तेजेंद्र नारायण मजुमदार, आरती अंकलीकर, मंजुषा पाटील, पं. राकेश चौरसिया, संजीव अभ्यंकर, विदुषी भारती प्रताप आदींसह निषाद-नौशाद हरलापूर, कृष्णा मुखेडकर यांसारख्या तरुण कलाकारांचाही सहभाग राहणार आहे असे पाटील यांनी सांगितले.