माझं मन शेतकऱ्यांसोबत; नववर्षानिमित्त राहुल गांधींनी परदेशातून केलं ट्विट

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 1 January 2021

राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी नव्या वर्षाच्या (New Year) निमित्ताने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधींनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण करत आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या शहीदांची आठवण काढली. ते पुढे म्हणाले की, मी आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकरी आणि मजुरांसोबत मनापासून आहे. 

राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी कृषी कायद्यांना विरोध करत आंदोलन (Farmers Protest)करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन दर्शवले आहे. तसेच त्यांनी या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकार शेतकऱ्यांचे हित पाहात नसून कॉरपोरेट कंपन्यांचा फायदा पाहात आहे. शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवणारे कायदे केंद्र सरकारने रद्द करावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. 

'कर्नल नरेंद्र नसते तर सियाचिनवर पाकचा ताबा असता'; PM मोदींनी वाहिली...

राहुल गांधी यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत ट्विट केलं आहे. नवीन वर्ष सुरु झालं आहे. आम्ही त्या लोकांची आठवण काढतो, त्यांना आपण गमावलं आहे आणि त्या लोकांचे आभार मानतो जे आपले संरक्षण करत आहेत. ज्यांनी देशवासियांच्या संरक्षणासाठी आपलं बलिदान दिलं आहे, असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत. 

राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत म्हटलं की, मी मनापासून शेतकरी आणि मजुरांसोबत आहे. जे सन्मान आणि स्वाभिमानासह अन्याय करणाऱ्या शक्तींच्याविरोधात लढाई लढत आहेत. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 

दरम्यान, 30 डिसेंबरला केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चेची सहावी फेरी पार पडली. बैठकीमध्ये शेतकरी प्रतिनिधींनी 4 विषय चर्चेसाठी पुढे ठेवले होते, त्यातील 2 मुद्यावर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सहमती झाल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. शेतकऱ्यांसोबत पुन्हा एकदा 4 सप्टेंबरला चर्चा होणार आहे. त्यामुळे यावेळी तरी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये तोडगा निघण्याची आशा आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My heart is with the farmers and labourers said rahul gandhi