'कर्नल नरेंद्र नसते तर सियाचिनवर पाकचा ताबा असता'; PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

टीम ई सकाळ
Friday, 1 January 2021

पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीमध्ये जन्मलेल्या कर्नल नरेंद्र बुल कुमार यांनी 1984 च्या मेघदूत ऑपरेशनमध्ये अनेक साहसी मोहिमा केल्या.

नवी दिल्ली - जगातील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक असलेल्या सियाचिन ग्लेशियरवर भारताचा ताबा राखण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या कर्नल नरेंद्र बुल कुमार यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिपिन रावत यांनी शोक व्यक्त केला. सध्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीमध्ये जन्मलेल्या कर्नल नरेंद्र बुल कुमार यांनी 1984 च्या मेघदूत ऑपरेशनमध्ये अनेक साहसी मोहिमा केल्या.

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर म्हटलं की, कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे. कर्नल नरेंद्र बुल कुमार यांनी शौर्य आणि कष्टाने देशाची सेवा केली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभाही आहोत.

सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी कर्नल नरेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं की, साल्टारो रेंज आणि लडाखच्या इतर भागांमध्ये आपलं वर्चस्व हे कर्नल नरेंद्र यांच्या शौर्यगाथेचा भाग आहे. त्यांच नाव सैन्याच्या इतिहासात नेहमीच आठवणीत राहील असंही रावत यांनी म्हटलं. 

कर्नल नरेंद्र यांनी 1984 च्या मेघदूत ऑपरेशनवेळी अनेक मोहिमा केल्या होत्या. सियाचिनमधील पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्यातील एक आघाडीवर लढणारे योद्धा होते. तसंच एक प्रसिद्ध गिर्यारोहक अशीही त्यांची ओळख होती. कर्नल नरेंद्र यांनी सर्वाधिक उंच अशा नंदादेवी पर्वतावर तिरंगा फडकावला होता.

हे वाचा - PM मोदींनी केले लाईट हाऊस प्रोजेक्टचे उद्घाटन; स्थानिक पर्यावरणानुसार बांधणार भूकंपरोधक घरे

पाकिस्तानमधील रावळपिंडी इथं नरेंद्र कुमार यांचा 1933 ला जन्म झाला होता. ते 1953 मध्ये भारतीय सैन्यात कुमाउं रेजिमेंटमध्ये सहभागी झाले होते. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हाय अल्टिट्यूट वॉरफेअर स्कूलचे कमांडंट म्हणून जर नरेंद्र कुमार यांनी सियाचिन ग्लेशियर आणि साल्टारो रेंजमध्ये मोहिमा केल्या नसत्या तर आता सियाचिन पाकिस्तानच्या ताब्यात असतं. कर्नल नरेंद्र यांना पद्मश्री पुरस्कारासह अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: colonel-narendra-bull-kumar passes away thursday