esakal | नाओमी ओसाकाचे ‘पॅकअप’
sakal

बोलून बातमी शोधा

naomi oasaka

नाओमी ओसाकाचे ‘पॅकअप’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या आणि दोन वेळची विजेती नाओमी ओसाकाचे यूएस ओपनचे अजिंक्यपद राखण्याचे स्वप्न दुःखाश्रूमध्ये वाहून गेले. तिसऱ्या फेरीत १८ वर्षीय लेलाह फर्नांडिस या नवख्या खेळाडूने ओसाकाचे आव्हान ५-७, ७-६ (२), ६-४ असे संपुष्टात आणले.

मानसिक स्वास्थ बिघडत असल्यामुळे फ्रेंच ओपनमधून मध्येच माघार घेणारी ओसाका प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळत होती. टोकियो ऑलिंपिकमध्येही तिचे पदकाचे स्वप्न भंग झाले होते. पुन्हा धीर एकवटून ती या यूएस ओपनमध्ये खेळायला आली खरी, पण तिचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित असल्याचे जाणवत नव्हते. दुसरा सेट टायब्रेकरवर गमावल्यावर ती स्वतःच्या रागावर नियंत्रण राखू शकली नव्हती.

रॅकेट कोर्टवर आपटून आपला राग व्यक्त करत होती. फर्नांडिसने सलग पाच गुण जिंकून टायब्रेक जिंकला होता. ओसाका सेटमध्ये मध्येच बाहेर जात होती, परंतु तिला ताकीद देण्यात आली नाही किंवा कारवाईही करण्यात आली नाही. ‘मी माझ्या भावना रोखू शकत नव्हते म्हणून बाहेर जात होते,’ असे ओसाकाने लढतीनंतर सांगितले. मी स्वतःलाच शांत राहण्यास सांगत होते. या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.

नाओमी ओसाकाचा पुन्हा ‘ब्रेक’

‘पुढचा सामना मी कधी खेळणार हे मला माहीत नाही. मी आता टेनिसमधून काही काळ विश्रांती घेणार आहे,’ असे अश्रूंना आवर घालत ओसाने आपली भावना व्यक्त केली. त्यामुळे ती पुन्हा कधी कोर्टवर परतेल याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. गेल्या काही काळापासून क्रीडा क्षेत्रातील मानसिक आरोग्याचा चेहरा बनलेल्या ओसाकाने वर्षाच्या प्रारंभीची फ्रेंच टेनिस स्पर्धा मध्येच सोडली होती. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भावनिक होत ती म्हणाली, ‘सध्या मला काय होतंय हे शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे, पराभूत झाल्यानंतर प्रचंड दुःख होत आहे.’

अखेर ताकीद मिळाली

तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला कॅनडाच्या फर्नांडिसने ओसोकाची सर्व्हिस भेदली. चिडलेल्या ओसाकाने चेंडू प्रेक्षकांमध्ये मारला. या वेळी मात्र चेअर अंपायरने तिला ताकीद दिली. नवव्या गेममध्ये सर्व्हिससाठी ती घाई करत होती. या वेळी प्रेक्षक शांत बसत आहेत की नाही याचीही ती पर्वा करत नव्हती, पण काहीही केले तरी तिला या अंतिम सेटमध्ये ब्रेक पॉइंट मिळवता आला नाही. ओसाकाला पराभवाचा धक्का देऊन सनसनाटी निर्माण करणाऱ्या फर्नांडिसने प्रथमच मोठ्या स्पर्धेची चौथी फेरी गाठली आहे. तीन सेटमध्ये मिळून तिने २८ विनर्स मारले. ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडून चांगल्या सर्व्हिस होत आहेत. हाच आत्मविश्वास घेऊन मी ओसाकाविरुद्ध कोर्टवर उतरले होते,’ असे फर्नांडिसने सामन्यानंतर सांगितले.

loading image
go to top