esakal | नरेंद्र मोदींनी ऑनलाइन सभेत टाळला ममता बॅनर्जी यांचा थेट उल्लेख

बोलून बातमी शोधा

Narendra Modi
नरेंद्र मोदींनी ऑनलाइन सभेत टाळला ममता बॅनर्जी यांचा थेट उल्लेख
sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीसाठी शुक्रवारी ऑनलाइन प्रचारसभा घेतली. त्यात त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर टीका केली, पण नेहमीप्रमाणे केला जाणारा ममता बॅनर्जी यांचा थेट उल्लेख मात्र टाळला. त्यामुळे ‘दिदी ओ दिदी‘चा सूर ऑनलाइनही घुमला नाही.

शहीद मिनार मैदानावर ही ‘व्हर्च्युअल'' सभा झाली. मुळ कार्यक्रमानुसार मोदी शुक्रवारी चार सभा घेणार होते, पण निवडणूक आयोगाने बंधने घातल्यामुळे त्यांना केवळ एक ऑनलाइन'' सभा घेता आली.

मोदी म्हणाले की, पश्चिम बंगाल सरकार बांगलादेशमधील अवैध स्थलांतरितांना आश्रय देत आहे. खंडणी उकळणाऱ्या टोळ्यांनाही रान मोकळे सोडण्यात आले आहे. संघटित गुन्हेही घडत आहेत. हे तीन गैरप्रकारच बंगालच्या विकासामधील अडथळे ठरले आहेत. बंगालच्या आठ टप्प्यांतील निवडणूकीसाठी मोदी यांनी ममता यांच्यावर सतत टीकेची झोड उठविली आहे. ते सभेत वारंवार दीदी ओ दीदी असे म्हणत मतदारांशी संवाद साधतात. त्यावेळी भाजप समर्थक महिला सुद्धा त्यांना प्रतिसाद देतात.

मोदी यांनी याप्रसंगी श्रमाची प्रतिष्ठा, उपजीविकेची सुकर संधी, उद्योगधंद्यांना पोषक वातावरण अशा मुद्द्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, बंगाल शांतता, सुरक्षा आणि विकासाची उत्कंठेने प्रतिक्षा करतो आहे.

हेही वाचा: जर्मनीहून ऑक्सिजनचे 23 प्लँट भारत करणार 'एअरलिफ्ट'

द्रुतगती न्यायालये उभारू

बंगालमध्ये महिलांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करून मोदी यांनी भाजप सरकार पीडित महिलांना लवकर न्याय मिळावा म्हणून राज्यभर द्रुतगती न्यायालये उभारेल अशी ग्वाही दिली.

सहाव्या टप्प्यात ८०. ८८ टक्के मतदान

पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्‍प्यात मतदान गुरुवारी ८०. ८८ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाने आज दिली. राज्यातील चार जिल्ह्यांतील ४३ विधानसभा मतदारसंघातील १४ हजार ४८० मतदान केंद्रांवर काल मतदान शांततेत झाले. नदिया जिल्ह्यात सर्वाधिक ८२. ७० टक्के मतदान झाले. मतदानाचा सर्वांत कमी टक्केवारी उत्तर २४ परगणा जिल्ह्यात नोंदविली. तेथे ६७ टक्के मतदान झाले. सहाव्या टप्प्यात १.०३ कोटी मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५०. ६५ लाख महिला आणि २५६ तृतीयपंथी मतदार होते.