esakal | जर्मनीहून ऑक्सिजनचे 23 प्लँट भारत करणार 'एअरलिफ्ट'

बोलून बातमी शोधा

Airlift Oxygen
जर्मनीहून ऑक्सिजनचे 23 प्लँट भारत करणार 'एअरलिफ्ट'
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- संरक्षण मंत्रालयाने जर्मनीहून २३ फिरते ऑक्सिजन निर्मिती यंत्रसंच हवाईमार्गे देशात आणण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिमिनीट ४० लिटर आणि प्रतितास २४०० लिटर ऑक्सिजन निर्मितीची प्रत्येक यंत्रसंचाची क्षमता आहे. ती कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सशस्त्र दले वैद्यकीय सेवा (आर्म्ड फोर्सेस मेडीकल सर्व्हिसेस-एएफएमएस) रुग्णालयांत बसविले जातील. संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते ए. भारतभूषण बाबू यांनी ही माहिती दिली.

कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर एका आठवड्यात हे काम होण्याची अपेक्षा आहे. हवाई दलास मालवाहू विमाने सज्ज ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. भविष्यात परदेशातून असे आणखी यंत्रसंच मिळविले जातील. सहज हलविण्याच्या सुविधेमुळे हे यंत्रसंचांचे महत्त्वाचे ठरतील, असेही त्यांनी नमूद केले. चार दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दले तसेच इतर संरक्षण संस्थांना आपत्कालीन आर्थिक अधिकार प्रदान करण्यात आल्याचे जाहीर केले होते. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी आवश्यक साहित्य मिळविता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: स्वत:ची SUV कार विकून गरजूंना ऑक्सिजन पुरवणारा मुंबईकर चर्चेत

हेही वाचा: ऑक्सिजन, कोविड सेवेसाठी IAF ची विमाने स्टँडबायवर

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. लोकांच्या हॉस्पिटलसमोर रांगा लागत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे ऑक्सिजन अभावी लोकांचा जीव जात असल्याची परिस्थिती आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सरकारसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच आता जर्मनीहून ऑक्सिजन निर्मिती यंत्र आणण्यात येणार आहेत. यामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ऑक्सिजनची निर्यात केंद्र सरकारने थांबवली आहे. शिवाय अनेक खासगी कंपन्यांमार्फत ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. कोरोना रुग्णांपैकी काही गंभीर असणाऱ्यांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते. सध्या देशात 3 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यातील अनेकांना ऑक्सिजन गरजेचा आहे. मागणी आणि पुरवठा यांमध्ये समतोल साधण्यासाठी केंद्राला कसरत करावी लागत आहे.